होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोगस डॉक्टरांच्या आवळल्या मुसक्या

बोगस डॉक्टरांच्या आवळल्या मुसक्या

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:19AMडोंबिवली : वार्ताहर

डॉक्टरच्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र लावून गुप्तरोगांवर उपचार करणार्‍या एका बोगस डॉक्टरच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. रफिक नासिर शेख (29, रा. मुंब्रा) असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात सिफा हेल्थ क्लिनिक या नावाने तो दवाखाना चालवत होता.

आपल्या दवाखान्यात गुप्त रोगांवरील आजारावर उपचार केले जात असल्याची जाहिरात या डॉक्टरने केली होती. हा डॉक्टर बोगस असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन नाईक यांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी आपल्या पथकामार्फत या दवाखान्यावर अचानक धाड टाकून रफिकला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान वैद्यकीय प्रमाणपत्र, क्लिनिक चालवायचा परवाना, शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली असता त्याला काहीही पुरावा सादर करता आला नाही. 

धक्‍कादायक म्हणजे, अंधेरी येथील मुश्ताक गुलाम हुसेन शेख या डॉक्टरच्या नावाचे प्रमाणपत्र क्लिनिकमधील भिंतीवर लावलेले सापडले. यावरून रफिक डॉक्टर असल्याचे भासवत रुग्णांवर बेकायदेशीरपणे उपचार करत असल्याचे स्पष्ट झाले. बाजारपेठ पोलिसांनी रफिकबरोबरच त्याला आपल्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणार्‍या अंधेरी येथील मुश्ताक शेख (44) यालाही अटक केली. रफिकने आतापर्यंत अनेक जणांवर उपचार करीत मोठ्या प्रमाणावर पैसे लाटल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक तायडे यांनी दिली. 

दरम्यान, रफिक आणि मुश्ताकवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात भादंवि. कलम 420 सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बोगस डॉक्टरसह अन्य कुणाचा या गुन्ह्यात सहभाग आहे का, याचा सखोल तपास करण्यात येत आहे. कल्याण कोर्टाने या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.