Thu, Jun 20, 2019 00:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोट दुर्घटनेप्रकरणी बोटमालकाविरोधात गुन्हा : दोघांना अटक

बोट दुर्घटनेप्रकरणी बोटमालकाविरोधात गुन्हा : दोघांना अटक

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:03AM

बुकमार्क करा
डहाणू : वार्ताहर

डहाणू पारनाका येथे शनिवारी झालेल्या बोट दुर्घटनेप्रकरणी  पार्थ अंभिरे, धीरज अंभिरे या दोघांना अटक करण्यात आली असून बोटमालक महेंद्रवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, दुर्घटनेत मृत झालेल्या जान्हवी सुरती, सोनाली सुरती, संस्कृती मायावंशी या तिघींवर शनिवारी रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोस्टगार्डच्या दोन्ही बोटी इंजीन बिघडल्यामुळे बंद असल्याने बचावकार्यास उशीर झाला. यावेळी मेरिटाईम बोर्डाची एक बोट मागवण्यात आली. तसेच स्थानिक 15 मच्छीमारांनी आपल्या बोटी बचावकार्यात जुंपल्या. प्रशासनाच्या हतबलतेवर मच्छीमारांनी तीव्र संताप व्यक्त केला. सागरी सुरक्षेसाठी असलेल्या स्पीडबोटी अनेक महिन्यांपासून  नादुरुस्त असल्याने बंद आहेत. त्यामुळे त्यांचा काहीच फायदा  न झाल्याने सागरी सुरक्षा विभागाच्या एकूणच कारभारापुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुर्घटनेनंतर भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर व बोटींनी समुद्रात शोध मोहीम राबवली. रविवारीही  सकाळपासूनच कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने संपूर्ण किनारपट्टीचा शोध घेतला. मात्र, कोणाचेही  प्रेत सापडले नसल्याने सकाळी साडेअकरा वाजता शोधमोहीम थांबवण्यात आली. सोनाली भगवान सुरती, जान्हवी हरेश सुरती आणि संस्कृती सूर्यकांत मायावंशी या तिघी दुर्घटनेच्या बळी ठरल्या. त्या मसोली, आंबेडकर नगर येथील रहिवासी होत्या. संस्कृती मायावंशी ही बुद्धिबळात निष्णात होती. तिने जिल्हा स्तरावर स्पर्धेत भाग घेऊन विजय मिळवल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. तसेच भगवान सुरती व हरेश सुरती यांनी आपल्या मुली अभ्यासात हुशार होत्या. त्यांना खूप शिक्षण घेण्याची इच्छा होती, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली.