Mon, Aug 19, 2019 06:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रक्तदाते ‘सुट्टी’वर!

रक्तदाते ‘सुट्टी’वर!

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी

उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम असल्याने अनेक रक्तदाते सुटीवर गेल्यामुळे त्याचा फटका विविध रुग्णालयांतील रुग्णांना आता बसू लागला आहे. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या म्हणण्यानुसार सध्या मुंबईतील रुग्णालयांत उपचार घेणार्‍या रुग्णांना 5000 रक्त युनिटची आवश्यकता आहे. मुंबईच्या विविध रुग्णालयांत दाखल रुग्णांना महिन्याला सुमारे 25000 युनिट रक्ताची आवश्यकता असताना एसबीटीसीकडे अवघे 20000 युनिट उपलब्ध आहेत. रक्ताचा अपुरा पुरवठा होत असल्याने अनेक रुग्णालयांनी अतिमहत्त्वाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत.

एसबीटीसीचे सहायक निर्देशक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले, प्रत्येक वर्षी एप्रिल ते जून या दरम्यान शहरात रक्ततुटवडा जाणवू लागतो. रक्तस्तुटवड्याचे एक कारण म्हणजे अनेक रक्तदाते या सुट्टीच्या काळात मुंबईबाहेर जात असतात. रक्तदान करणार्‍यांपैकी अनेकजण  तरुण असतात. महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी असल्याने हा तरुण वर्ग शहराबाहेर गेला आहे. शिवाय इतरही अनेक लोक आपल्या गावी गेले आहेत. इतर दिवसांच्या तुलनेत एप्रिल ते जून या काळात रक्तदान शिबिरेही फार कमी प्रमाणात आयोजित केली जातात.