Mon, Aug 26, 2019 02:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › Blog- राज ठाकरे : मित्राच्या शोधात शत्रूंच्या कळपात

Blog- राज ठाकरे : मित्राच्या शोधात शत्रूंच्या कळपात

Published On: Mar 25 2018 10:20AM | Last Updated: Mar 25 2018 10:20AMमहाराष्ट्रात आज घडीलादेखील ‘भाजप विरुद्ध सगळे’ असे चित्र आहे. मात्र जे विरोधात आहेत ते वेगवेगळे आहेत. राज यांच्या हाकेला ओ देत ते सगळे एक होण्याची शक्यता तपासली तर राज तूर्तास एकटेच रिंगणात उतरतील असे दिसते. अर्थात सोबत मराठी माणसांचे प्रश्‍न असतील...- विवेक गिरधारी 

भारत मोदीमुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केले. राज यांनी हाक देताच झाडून सारे विरोधी पक्ष लगेच चौपाटीवर जमतील अशी अपेक्षा अर्थात नव्हती आणि नाही. प्रत्येक जण कुठे ना कुठे अडकलेला आहे. त्यातून बाजूला व्हायला तर वेळ लागेलच. पण राज यांच्या हाकेला खरच कुणी ओ देणार आहे ? मराठी भूमिपुत्रांच्या हक्कांसह महाराष्ट्राचे धगधगीत प्रश्‍न घेवून राज नुसते उभे राहिलेले नाहीत. या प्रश्‍नांशी इमान राखण्यासाठी त्यांनी मोठी राजकीय किंमतदेखील मोजली आणि अशी किंमत मोजणारा नेहमी एकटा असतो. राजदेखील हाती येतील ते प्रश्‍न घेवून आजवर एकटेच लढत आले आहेत . आता निवडणुकांचे रिंगण आखले जात असताना राज राजकीय मित्रांच्या शोधात निघालेले दिसतात. हा शोध ते कुठे घेणार आहेत ? प्रश्‍न असा आहे की, शत्रूंच्या कळपात राज यांच्या हाती कुणी दोस्त खरेच लागेल काय ?

राज यांची राजकीय ताकद विधानसभेत किंवा कुठल्या महापालिकेत मोजण्यात अर्थ नाही. राज हीच एक ताकद आहे आणि गुढीपाडवा मेळाव्यात उसळलेल्या विराट जनसागरानेही ती दाखवून दिली. अशा गर्दीचे मानसशास्त्र विचित्र असते आणि खुद्द शिवसेनाप्रमुखांनीही ते हयातभर भोगले. फार उतार वयात सेनाप्रमुखांसाठी सभांना जमणारी गर्दी मतदानाच्या रांगेतही उभी राहू लागली. त्या तुलनेत राज यांना आतापर्यंत मिळालेले यश मोठे आहे. राजकीय समीकरणे उलटसुलट होत गेली अलीकडे आणि राज यांचा राजकीय पटदेखील त्यात मुळासकट हलून गेला. तरीही हा माणूस विधिमंडळाच्या गदारोळात हरवलेले मराठी माणसाचे जीवनमरणाचे प्रश्‍न घेवून उभा आहे आणि ते ऐकण्यासाठी महाराष्ट्राचेही कान लागलेले असतात. या अर्थाने राज ठाकरे नावाची एक ताकद मराठी राज व्यवस्थेने नीट मान्य केली आहे. आता याच राजव्यवस्थेत मित्र म्हणून राज यांच्या हाकेला कोण ओ देणार, या प्रश्‍नाचे उत्तर पुन्हा एक ना अनेक समीकरणांत शोधावे लागेल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत कसे पराभूत करता येईल याचा एक मंत्रच भाजपचे केंद्रीय मंत्री राहिलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी विरोधी पक्षांच्या हाती ठेवला आहे. ‘मोदी विरुद्ध सगळे’ अशी लढाई झाली तरच विरोधक जिंकू शकतात, असे हा मंत्र सांगतो. भाजपच्या एका उमेदवाराविरुद्ध सर्व विरोधकांचा मिळून एकच उमेदवार उभा ठाकला तरच या मंत्राची मात्रा चालणार, अशी पूर्वअट आहे . सबब लोकसभेच्या रिंगणात विरोधक काय करतात यावर सारे अवलंबून आहे. विरोधक एकएकटे लढले तर त्या प्रत्येकाला संपवण्याचा विडाच मोदींनी उचलला आहे. त्यामुळे एकत्र येण्याच्या हालचाली विरोधकांमध्ये देशभर सुरू झाल्या याचे श्रेय मोदी यांनाच जाते, असेही शौरी म्हणतात. अर्थात मोदी विरुद्ध सगळे हा शौरी यांचा हा मंत्र बातमी बनून नंतर आला. त्याआधीच राज यांनी भारत मोदीमुक्त करण्यासाठी एकत्र येण्याची मंत्रावेगळी हाक दिली .

महाराष्ट्रात आज घडीलादेखील ‘भाजप विरुद्ध सगळे’ असे चित्र आहे. मात्र जे विरोधात आहेत ते वेगवेगळे आहेत. राज यांच्या हाकेला ओ देत ते सगळे एक होण्याची शक्यता तपासली तर राज तूर्तास एकटेच रिंगणात उतरतील असे दिसते. अर्थात सोबत मराठी माणसांचे प्रश्‍न असतील. मराठी महाराष्ट्र त्यांच्यासोबत किती उभा राहतो यावर प्रश्‍नांचे उत्तरही अवलंबून असेल.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत . जागा वाटपापर्यंत ते एकत्र राहिले तर त्यांचे नशीब समजायचे. तशीही राजकीय घटस्फोटांची गती जास्त आहे. कारण त्यासाठी कुठल्या कुटुंब न्यायालयात जावे लागत नाही. या दोन्ही काँग्रेस बहुभाषिक राजकारण करतात. परिणामी त्यांच्या कुठल्याच राजवटीत मराठी माणसाचे प्रश्‍न कधी सुटले नाहीत. उलट ते वाढले. तेच प्रश्‍न घेऊन राज यांचे राजकारण उभे आहे. मराठीच्या मुद्द्यावर ते तडजोड करत नाहीत . त्यामुळे दोन्ही काँग्रेसशी मनसेचे जमेल असा अंदाज लावणेदेखील खुळचटपणाचे ठरेल. दोन्ही काँग्रेसने पुढाकार घेवून तिसरी आघाडी स्थापन केली तरी अशा आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात मराठी माणसाचे हक्क आणि त्यासाठी निकराचे राजकारण बसत नाही. त्यामुळे अशा कुठल्याही आघाडीत मनसेमुळे बिघाडीच होवू शकते. मग आता मित्र म्हणून मनसे कुणाकडे पाहू शकते ?

गुढीपाडवा मेळाव्यात राज यांचे लक्ष्य होते फक्त नरेंद्र मोदी. भारतीय जनता पक्ष नव्हे! शिवाय एरव्ही शिवसेनेला मजबूत चिमटे काढण्याची एकही संधी न सोडणारे राज या मेळाव्यात सेनेवर एक शब्दही बोलले नाहीत. त्यांनी ना सेनेला डोळा मारला ना टाळीला हात पुढे केला. म्हणजे शिवसेनेला त्यांनी एक संधी देऊन ठेवली, असे मानता येते. ही संधी ओळखण्यासाठी शिवसेनेला मनसेकडे बघण्याची नजर बदलावी लागेल. भाऊबंदकीची झापडे बाजूला करून राजकारणाचा विचार करावा लागेल. मुंबईत मनसेचे होते नव्हते ते सर्व सहा नगरसेवक फोडले म्हणजे मनसे संपली असे नाही. नगरसेवक फोडले म्हणजे मनसेचे मतदार फोडले असेही समजण्याचे कारण नाही. माणसे निवडून आणून ती अशी फोडाफोडीसाठी उपलब्ध करून द्यायला मनसेचा जन्म राजकीय सरोगसीसाठी झालेला नाही. आघाडीत जागा मिळाली काय किंवा स्वबळावर लढावे लागले काय, मनसेचा सर्वाधिक फटका बसणार तो शिवसेनेलाच. मुंबई महापालिकेच्या मागच्या निवडणुकीत भाजपच्या आशीष शेलारानी सेनेचा भगवा उतरवलाच होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने तो वाचला आणि आणि मनसेचे सहा नगरसेवक येवून मिळाल्याने तूर्त मजबूत झाला. शिवसेनेने ही वस्तुस्थिती स्वीकारली तरच ती मनसेची नैसर्गिक मित्र होवू शकते. पण इथेही मराठी माणसाचा पाय खेचण्याचा दुर्गुण आडवा येण्याची भीती आहेच.

मराठी माणूस जसा एकमेकांचे पाय खेचतो तद्वतच ठाकरेदेखील ठाकरेंना पाण्यातच पहात आले आहेत. हे पाणी जरा जास्तच वाढले आणि राज सेनेबाहेर पडले. त्यानंतर काही वर्षानी तेजस उद्धव ठाकरे यांना खेकड्याची नवी जात सापडली आणि या खेकड्याचे नाव त्यानी ठाकरेच ठेवले, हा अर्थात योगायोग समजायचा. ही खेचाखेची बाजूला सारून एक सशक्त राजकीय मित्र म्हणून सेना मनसेसोबत उभी राहिली तर भाजपविरोधात सेनेची सुरू असलेली लढाई मजबूत होईल. पण मराठी मतांचा भूखंड आम्हाला वडिलोपार्जीत इस्टेट म्हणून मिळाला आणि त्याचा एक कोपरादेखील आम्ही चुलत भावास देणार नाही असा सेनेचा बाणा असल्याने सेना-मनसे एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे. राज यांनी थेट मोदींविरुद्ध रणशिंग फुंकल्याने महाराष्ट्र भाजपचीही अडचण होवून बसली आहे . नाही तर सेनेला रोखण्यासाठी मनसेला बळ देणे भाजपच्या तब्येतीला पोषकच ठरले असते. ही सर्व समीकरणे पाहता शत्रूंच्या कळपात मनसेला मित्र गवसणे कठीण दिसते.

महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहिलीच तर लोकसभा न लढवता मनसेने तिला पाठिंबा द्यावा आणि त्या बदल्यात विधानसभेच्या किमान तीस जागांवर मनसेविरुद्ध तिसर्‍या आघाडीने उमेदवार देवू नयेत, अशी एक व्यवस्था असू शकेल. अर्थात ही कुजबूज आहे . मुंबई , ठाणे , नाशिक, पुणे अशा निवडक, कळीच्या शहरांत मनसेच्या उमेदवारांसमोर तिसरी आघाडी रिंगणात नसेल. हा मनसेचा प्रस्ताव असू शकतो आणि तिसर्‍या आघाडीला तो मान्य झाला पाहिजे .

अर्थात हे सारे खयाली पकोडे आहेत. तसेही दिवस खयाली पकोड्यांचे असले तरी एक गोष्ट अगदीच नाकारून चालणार नाही. ती म्हणजे, राज आणि शरद पवारांसारखे दोन मोठे नेते बंद खोलीत बसतात, आणि तब्बल एक घंटा नुसत्या सदिच्छा देतात, यावर कोण विश्‍वास ठेवणार?

Tags : Blog, Raj Thackeray, MNS