होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग : युतीतला 'मुका' मार (एक साहसकथा)

ब्लॉग : युतीतला 'मुका' मार (एक साहसकथा)

Published On: Apr 18 2018 10:39AM | Last Updated: Apr 18 2018 10:39AMसुहास नाडगौडा

आम्ही लहानपणापासूनच गुप्तहेरगिरीचे चाहते आहोत. शेरलॉक होम्स, काळापहाड वगैरे मंडळी आमचे आदर्श. पुढे आम्ही मोठे झाल्यावर तर 'राजकीय गुप्तहेरगिरी' हा आमचा फावल्या वेळेतील छंद बनवला. पेप्रातल्या राजकारणाच्या बातम्या ज्या गोपनीय सूत्राकडून वगैरे म्हणून सांगितल्या जातात त्यांच्यापैकी आम्ही एक सूत्र व्हायचं हे आमचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही तयारी देखील सुरु केली आहे. आता निवडणुकांचा काळ जवळ येणार असल्याने आम्हाला उसंत अशी नाहीय. महाराष्ट्रात तर राजकीय उलथापालथ होण्याचा काळ जवळ येऊन ठेपला आहे. (पण अजून वेळ आलेली नाही, असं घड्याळवाले काका सांगतात. असो!)

तर चालू काळात महाराष्ट्रात आघाडी-युतीवरून घोळ सुरु आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातल्या मोठ्या नेत्यांच्या 'इकडून तिकडे -तिकडून इकडे' अश्या फेऱ्या सुरु आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या गोपनीय सूत्र होवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी अच्छे दिन आले आहेत. कालचीच घटना सांगतो.

चंदुकाका कोल्हापुकर आणि सुधीरजी मुंगंटीवारजी लगबगीने कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी चालले होते. चंदुकाकांनी (दिवाळीनंतर)अभ्यंगस्नान केलं होतं, तर सुधीरजींनी जितकी जमेल तितकी घोटून दाढी केली होती, दोघांनी अत्तराचे फाये कानांत घातले होते, ठेवणीतले कपडे दोघांनीही घातले होते. त्यांच्या आलिशान कारमधून ते चालले होते. आम्हांस हे सगळे गूढ, गुढेस्ट आणि गुढोत्तम वाटल्याने आम्ही त्यांचा पाठलाग (अर्थात ट्याक्सीने) करू लागलो. त्यांच्या आसपास कोणीही सुरक्षारक्षक वगैरे नसल्याने गूढ अधिकच वाढत चाललं होतं. गाडीचे सारथ्य अर्थातच चंदुकाका करत होते. (हल्ली गाडी आणि आमदार कोणाचाही असला तर सारथ्य चंदुकाकाच करतात, पण ते एक असो.)

आम्ही गप्पगुमान त्यांचा पाठलाग करत होतो.(पापाराझीच म्हणा ना !) त्यांची गाडी अचानक एका ठिकाणी थांबली, आम्ही ट्याक्सीतून डोके अंमळ बाहेर काढून त्या ठिकाणचा पत्ता वाचला, 'सामना भवन'. अग्रलेख वाचून दचकावं तसं आम्ही दचकलो. सदर जोडगोळी सामनाच्या हाफीसात गेली, आमच्यात तितकी हिंमत नसल्याने आम्ही ट्याक्सीतच बसून राहिलो, फक्त डोकं बाहेर ठेवलं. सुमारे साडेतीन मिनिटं आणि 22 सेकंदांनी जोडगोळी पडलेल्या चेहऱ्याने बाहेर आली. सदर दोघेही गृहस्थ जरी साधे हसले तरी त्यांच्याप्रति माया दाटून यावी असेच आहेत, इथं तर हिरमुसल्या चेहऱ्यांनी बाहेर आले होते, आम्हांला राहवले नाही. आम्ही झटकन ट्याक्सीतून उडी मारली. 'साssब हमराs भाडाsssss' असं काहीतरी कानी पडतंय हे जाणवलं, पण आम्ही होशात नव्हतो. आम्ही पटकन जोडगोळींच्या पुढ्यात ठाकलो, दोघेही अचानक दक्ष स्थितीत आले. आम्ही आमचा चेहरा इतका बावळट केला होता (म्हणजे, जसा आहे तसा ठेवला होता) की त्यांना तसल्याही परिस्थितीत आमची दया आली.

"क्या मंगताय?" मुंबईत एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी ज्या भाषेत बोलतो त्या भाषेत सुधीरजींनी आम्हाला विचारलं.

"इदर किदर आये थे आप दोनो मिल्के?" आम्ही त्यांच्या भाषेचे पांग फेडले.

"सुधीरजी, अहो मराठी दिसतोय हा..त्यात शोधपत्रकारितेला दिसतोय, मराठीत बोला" चंदुकाकांनी सवयीने बौद्धिक पाजलं.

"काय हो, कोण तुम्ही ? इथं काय काम काढलंय?" सुधीरजी.

"माफ करा, पण आम्ही तुमचा पाठलाग करत होतो, तुम्ही सामनाच्या हाफीसमध्ये गेलेलं दिसलं, कायतरी न्यूज मिळेल म्हणून बाहेर थांबलो होतो, पण तुमचे चेहरे बघून माझ्यातील पत्रकार मरून माणूस जिवंत झाला"

"बरं मग?" चंदुकाकांना आमचा संशय आला असावा.

"इतक्या लवकर कसे बाहेर आलात, आणि मुळात सामनाच्या हाफीसात कशाला आला होतात?" आम्ही कसेबसे विचारले.

"संजयजी काल बोलले, भाजपने मुका घेतला तरी युती शक्य नाही, पण आम्ही शाखेत वाढलेले, त्यामुळे जे करून काहीही साध्य होत नाही तेच आम्ही हटकून करतो" चंदुकाका बोलले.

"म्हणजे तुम्ही सामनावीरांचा मुका घ्यायला आला होतात?" आम्ही अक्षरशः हादरून जात विचारलं.

"अर्थात..इलाज नसला की काहीही करावं लागतं" सुधीरजी पडेल आवाजात बोलले.

"मग काय झालं? घेतला का मुका?..युतीचं काय?" आम्हांला मुक्यापेक्षा युतीत जास्त रस आहे ( हा आक्षेप आमच्या 'हि'चा आहे, असो.!) म्हणून आम्ही मुद्याला तोंड घातलं.

"कसलं काय हो, संजयजींच्या या बाजूला मी आणि त्या बाजूला चंदुकाका बसले होते, आम्ही दोघांनी एकमेकांना खुणा केल्या आणि मुका घ्यायला म्हणून एकदम उठायला आणि नेमकं त्याचवेळी मातोश्रीतुन कॉल आल्याने संजयजीं तत्क्षणी जागचे उठायला एकच गाठ पडली" सुधीरजी एखाद्या पातकाची कबुली द्यावी तसे बोलले.

"म्हणजे मुका घेतला गेलाच नाही तर?" आम्ही सावधपणे विचारलं.

"झाला ना मुका.." चंदुकाकांनी वैतागले.

"मग, तुमचे चेहरे का इतके पडलेले?" आम्ही पुन्हा मगाशीइतक्याच सावधपणे विचारलं.

"अहो, संजयजीं नेमकी उठून गेल्याने आम्ही दोघे एकमेकांच्या...छ्या...जाऊद्या हो.."

आम्हाला त्याच्या पडलेल्या चेहऱ्यांचे खरे कारण कळले, आमचेही तोंड विनाकारण कडू झाले.

आम्ही माघारी फिरलो, ट्याक्सीवाला आमची वाटच बघत होता, त्याच्या चेहऱ्यावरचे 'प्रेमळ' भाव बघून आम्ही हातात मगाशीचे देय भाडे घेऊनच त्याच्याकडे कूच केले. असो ! 

Tags: blog, Shivsena, BJP, Alliance, Election, Minister, Chandrakant Patil, Sudhir Mungintiwar