Sun, May 19, 2019 22:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग : भरतीची घोषणाही 'गाजर' ठरू नये

ब्लॉग : नोकरभरतीची 'गाजरं' आणखी किती दिवस?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शंकर पवार, पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन वर्षांमध्ये राज्यात विविध खात्यांत ७२ हजार पदे भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. ही घोषणा राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर आहे. परंतु, अशा खबरी आजपर्यंत कित्येक आल्या तरी बेरोजगार तरुणांना खूष करू शकल्या नाहीत. त्यामुळे ही घोषणा तरी येत्या काळात सत्यात उतरते का? की मागील घोषणांप्रमाणे हवेतच विरून जाते हा प्रश्न आहे.

गेल्या काही काळापासून राज्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. परंतु, सरकारकडून याकडे फारसे लक्ष पुरवलेले दिसत नाही. रोजीरोटीसाठी रोजगार मिळावा म्‍हणून कित्येक शिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहेत. पण, त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे रोजगार उपलब्‍ध करून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यात उच्‍च शिक्षित तरुणही चतुर्थ श्रेणीच्या नोकर्‍यांसाठी अर्ज करत असल्याचे चित्र आहे. 

शेतीच्या दुरावस्‍थेमुळे राज्यातील शेतकर्‍यांची मुले कायमस्‍वरूपी नोकरीसाठी स्‍पर्धा परीक्षांचा मार्ग निवडतात. बहुसंख्य स्‍पर्धा परीक्षा या पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देता येतात. त्यामुळे आयुष्यातील २०-२१ वर्षे शिक्षणात घालवल्यानंतर नोकरीसाठी पुन्‍हा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्‍टा केली जाते. मात्र, सरकार वरचेवर जागाच भरत नसल्याने वर्षामागून वर्षे नोकरीची वाट पाहण्याची वेळ या बेरोजगार तरुणांवर आली आहे. त्यातच या सरकारने सत्तेवर आल्यापासून सरकारी भरतीच्या आश्वासनांचे गाजर अनेकदा दाखवले आहे. परंतु, प्रत्यक्षात जागा भरल्याच गेल्या नाहीत. अद्याप विद्यार्थी आशावादीच असल्याचे चित्र आहे.

वाचा : सरकारी सेवेतील ७२ हजार पदे भरणार : मुख्यमंत्री 

नोकरी नसल्याने या मुलांना विवाहासारख्या सामाजिक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. तसेच वयाची तिशी ओलांडूनही स्‍वत:च्या पायावर उभा राहता येत नाही. अशाने मानसिक तोल जाऊन कित्येक विद्यार्थ्यांनी आत्‍महत्या केल्याच्याही घटना राज्यात झाल्या आहेत. 

शिक्षक भरतीचे 'गाजर'

शिक्षण क्षेत्रात तर २०१३ पासून भरती थांबली आहे. राज्यात प्राथमिक पासून उच्‍च शिक्षण स्‍तरापर्यंत शिक्षक व प्राध्यापकांची अनेक पदे रिक्‍त आहेत. मात्र, सरकारने याकडेही दुर्लक्ष केले आहे. पात्रतेसाठी परीक्षांमागून परीक्षा घेणार्‍या सरकारने भरतीकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे उच्‍च विद्याविभूषित विद्यार्थ्यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. कित्येक पीएच.डी., सेट, नेट, बीएड., डीएड धारक विद्यार्थी नोकरीच्या शोधात अल्‍पशा मानधनावर किंवा विनामानधन राबत आहेत. तर, काही ठिकाणी हतबल विद्यार्थ्यांनी जगण्यासाठी दुसरी वाट शोधण्याचेही प्रयत्‍न चालवले आहेत. शिक्षणमंत्र्यांनी अनेकदा शिक्षक भरती करणार असल्याचे गाजर दाखविले. २४ हजारांपर्यंत भरतीचे आकडेही सोडले. मात्र, आतापर्यंतचा अनुभव पाहता हे केवळ आकड्यांचा खेळच होता, असेच वाटते. 

परीक्षा आयोगाची,  निकाल न्यायालयात

राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध स्‍पर्धा परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक अगोदरच जाहीर केले जाते. परंतु, त्यानुसार नियमित परीक्षा होतानाचे चित्र दिसत नाही आणि त्यातूनही परीक्षा झाल्या तर त्याचा निकाल लागून प्रत्यक्ष नोकरीपर्यंत जाणे हे एखादे मोठे दिव्य पार केल्यागत आहे. अशीच काहीशी स्‍थिती इतर नोकर्‍यांसाठीच्या परीक्षांसाठीही आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर आयोगाने परीक्षा घेतली असली तरी निकाल मात्र न्यायालयात लागणार, असे गमतीने बोलले जाते. तसे पाहता ही वस्‍तूस्‍थिती आहे. एकीकडे सरकार जागा कमी काढते. लाखोंच्या संख्येने मुले परीक्षा देत असतात. परंतु, या परीक्षेतील त्रुटी आणि इतर कारणांमुळे भरती रखडलेल्याच स्‍थितीत असते. यामुळेही विद्यार्थी त्रस्‍थ आहेत. 

खासगी क्षेत्राकडूनही निराशा

सरकारी खात्यांतील ही अवस्‍था असताना खासगी क्षेत्रांमध्येही पाहिजे तेवढ्या नोकर्‍या उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेती करावी तर शेतमालाला दर मिळत नाहीत आणि नोकरी करावी तर नोकर्‍याच उपलब्ध नाहीत, अशी स्‍थिती ग्रामीण भागातील शेतकरी आणि गोरगरिबांच्या पोरांची झाली आहे. शहरातीलही सुशिक्षित मुलांसाठीचे चित्र यापेक्षा वेगळे नाही. 

निवडणुकीच्या तोंडावर आकड्यांचा खेळ

अच्‍छे दिनचे स्‍वप्‍न दाखवून तरुणाईच्या जीवावर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. तर राज्यातही भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. मात्र, बेरोजगारीचा प्रश्न ही दोन्‍ही सरकारे सोडवू शकली नाहीत. आता २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पुन्‍हा नव्याने आश्वासनांची बरसात सुरू झाली आहे. गुरुवारी रेल्‍वेमंत्र्यांनी ट्‍विट करत रेल्‍वे खात्यात ९० हजारांऐवजी १ लाख १० हजार जागा भरणार असल्याचे सांगितले. यापूर्वीही असेच जागा भरणार असल्याचे मोठ-मोठे आकडे जाहीर झाले होते. परंतु, ते प्रत्यक्षात कितपत उतरले हे न कळलेलेच बरे.

वाचा: एक कोटी नव्या नोकर्‍यांची संधी

राज्यातही २४ हजार शिक्षक भरती करणार, लवकरच प्राध्यापक भरती होणार अशा वावड्या उठल्या आणि उठवल्या गेल्या. आता मुख्यमंत्र्यांनी ७२ हजारांचा नोकर भरतीचा आकडा जाहीर केला. निवडणुकीच्या तोंडावर का असेना पण बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी, हाच आशावाद आहे. त्यासाठी हे आजपर्यंतचे आकड्यांचे खेळ सत्यात उतरावेत हीच अपेक्षा.


  •