Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयातील टोलवाटोलवीने त्रस्त अंध शिक्षकाचा आत्मदहनाचा इशारा

मंत्रालयातील टोलवाटोलवीने त्रस्त अंध शिक्षकाचा आत्मदहनाचा इशारा

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी 

औरंगाबाद येथील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासनाने एका अंध शिक्षकाला खोट्या विनयभंगाच्या प्रकरणात गुंतवले आणि मंत्रालयानेही टोलवाटोलवी चालवल्याने सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांपासून त्यास गेली चार वर्षे वंचित राहावे लागले आहे. झालेला अन्याय दूर करण्यासाठी मंत्रालयात येरझार्‍या मारणारा हा कर्मचारी त्रस्त झाला असून, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आपल्या आयुष्याची पुंजी देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा मंत्रालयातच आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. 

जे. एम. कळसणे यांनी औरंगाबाद येथील शासकीय ज्ञानविज्ञान या महाविद्यालयात पेटीवादक म्हणून काम केले. 2006 साली तत्कालीन प्राचार्य रंजन गर्गे यांची मुलगी संगीत विभागात शिकत होती. तिला कमी गुण मिळतील या भीतीने अखेर कारस्थान रचले गेले आणि संपूर्ण वर्गाचा विनयभंग केल्याचा ठपका या 100 टक्के अंध शिक्षकावर ठेवण्यात आला. या प्रकरणाचा भडका उडवण्यासाठी राजकीय मोर्चाचेही नियोजन करण्यात आले. गर्गे यांची मुलगी तक्रारदार आणि चौकशी अधिकारी गर्गेच. या प्राथमिक चौकशीतून जायचा तोच अहवाल गेला. त्यानंतर  औरंगाबादच्या शिक्षण सहसंचालकांनी नेमलेल्या एक सदस्यीय समितीनेही एकतर्फीच चौकशी केली. ही चौकशी कळसणे यांच्या गैरहजेरीत करण्यात आली आणि कळसणे यांच्या दोन वेतनश्रेण्या रोखल्या. या विरुद्ध शिक्षण संचालकांकडे प्रशासकीय अपील करण्यात आले. त्यावरील निर्णयात शिक्षण संचालकांनी एकतर्फी चौकशी झाल्याचे मान्य केले आणि रोखलेल्या दोन पैकी एक वेतनश्रेणी परत दिली. मात्र, निलंबनाच्या कालावधीवर कोणताही निर्णय दिला नाही. 

कळसणे दोन वर्षांहून अधिक काळ निलंबित होते. त्यांना परत कोणतेही कारण न देता कामावर घेताना गैरवर्तनाचा ठपका ठेवत ही वेतनश्रेणी कापण्याची शिक्षा देण्यात आली. मात्र, या निलंबन काळाचे काय? याचे उत्तर नाही. परिणामी, कळसणे यांनी कापलेली वेतनश्रेणी परत मिळावी आणि निलंबन कालावधी सेवा कालावधी म्हणून धरावा अशी मागणी केलेली आहे. 

कळसणे यांचा पुनरीक्षण अर्ज 6 ऑगस्ट 2014 पासून मंत्रालयात प्रलंबित असल्यामुळे त्यांना अद्याप पेन्शन मिळालेली नाही. या अन्यायाबाबत कळसणे यांनी मंत्रालयात वारंवार पत्रव्यवहार केला. तरीही त्यांच्या अर्जावर उच्च व तंत्रशिक्षण विभाग दखल न घेताच पुणे येथील कार्यालयाकडे टोलवाटोलवी करीत असल्याचा  आरोप अंध अपंग हक्‍क सुरक्षा संघर्ष समितीने केला आहे.