Wed, Mar 27, 2019 00:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोष व्हीव्हीपॅटमध्ये; ईव्हीएममध्ये नाही!

दोष व्हीव्हीपॅटमध्ये; ईव्हीएममध्ये नाही!

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:22AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

पालघर,भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी केलेला ईव्हीएम यंत्रांमधील बिघाडाचा आरोप राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्‍वनीकुमार यांनी फेटाळला आहे. आपले मत ज्या उमेदवाराच्या नावापुढील बटण दाबले आहे त्याच उमेदवाराला गेले आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या व्हीव्हीपॅट यंत्रात झालेला बिघाड दूर करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

अश्‍वनीकुमार म्हणाले, व्हीव्हीपॅट यंत्रात 25 टक्के  बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला काहीसा विलंब लागला. मात्र, ईव्हीएम मशीनमध्ये कुठेही हस्तक्षेप अथवा त्याच्याशी छेडछाड झालेली नसून या मशीनमध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. राजकीय पक्षांनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. इव्हीएमला बाहेरून कोणतेच इनपुट नाहीत. तसेच ते इंटरनेटशीही जोडलेले नसल्याने त्यामध्ये बदल करणे अशक्य आहे.

निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याने भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात या पध्दतीला सध्या तरी पर्याय नाही. नाशिक, मुंबई आणि कोकण मतदार संघांतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूका येत्या 25 जूनला होत आहेत.या निवडणूकांचा निकाल 28 जूनला लागणार आहे. या मतदारसंघातील मतदारांची नवीन यादी तयार झाली आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात 54 हजार 572 तर मुंबई शिक्षक मतदारसंघात 9955 मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघात 67 हजार 869 तर कोकण पदवीधर मतदारसंघात 95 हजार 884 मतदारांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.