Sat, Apr 20, 2019 10:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळ्या यादीतील कंपनीला 7 कोटींचे कचरा वाहतूक कंत्राट

काळ्या यादीतील कंपनीला 7 कोटींचे कचरा वाहतूक कंत्राट

Published On: May 16 2018 1:43AM | Last Updated: May 16 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई शहरातील कचरा देवनार, मुलुंड व कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडपर्यंत वाहून नेण्यासाठी पालिकेने कचरा घोटाळ्यानंतर काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराची पुन्हा एक वर्षासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने आणलेल्या या प्रस्तावावर स्थायी समितीतही शिक्कामोर्तब झाल्यामुळे  कंत्राटदाराला तब्बल 6 कोटी 59 लाख रुपयांचे कंत्राट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शहरातील कुलाबा, फोर्ट, काळबादेवी, चिराबाजार, गिरगाव, ताडदेव, मुंबई सेंट्रल, ग्रॅण्टरोड, भायखळा, नागपाडा, काळाचौकी, लालबाग, परळ, शिवडी, वडाळा, माटुंगा, दादर, वरळी, प्रभादेवी, शिवाजी पार्क व धारावी भागातील कचरा महालक्ष्मी येथे हायड्रोलिक ऑपरेटेड मेकॅनाइज्ड कचरा हस्तांतरण केंद्रात जमा करण्यात येतो. या केंद्रात जमा होणारा कचरा बंदिस्त वाहन व डम्परमधून कांजूरमार्ग, मुलुंड, देवनार डम्पिंग ग्र्राऊंडपर्यंत वाहून नेण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे. हे कंत्राट मंगळवार 8 मे 2018 रोजी संपुष्टात आले. त्यामुळे पालिकेने विद्यमान कंत्राटदार कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र कविराज याला काळ्या यादीत टाकण्यात आल्यामुळे त्याला कंत्राट देऊ नये, अशी मागणी स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली होती. कविराज याने कचर्‍यामधून दगड-माती वाहून नेल्याचे उघडकीस आले आहे. तरीसुध्दा याच कंत्राटदारला पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. 

कविराज याचा काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांनी स्थायी समितीत स्पष्ट केले.  त्यामुळे सोमवारी या प्रस्तावाला स्थायी समितीत एकमताने मंजुरी देण्यात आली. 650 टन प्रतिदिन याप्रमाणे 365 दिवसांसाठी कंत्राटदाराला 6 कोटी 59 लाख रुपये देण्यात येणार आहेत. महालक्ष्मी कचरा हस्तांतरण केंद्र येथे 7 वर्षे कालावधीसाठी नवीन हायड्रोलिक ऑपरेटेड मेकॅनाइज्ड कचरा हस्तांतरण केंद्र बसवण्याकरिता निविदा मागवण्यात आल्या आहेत. नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे विद्यमान कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.