Thu, Apr 25, 2019 13:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘काळा घोडा’ला इस्रायलच्या पंतप्रधानांचे नाव देण्यावरून वाद

‘काळा घोडा’ला इस्रायलच्या पंतप्रधानांचे नाव देण्यावरून वाद

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 1:38AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

दक्षिण मुंबईतील काळा घोडा चौकाला इस्त्रायलचे माजी पंतप्रधान शिमॉन पेरेज यांचे नाव देण्यासाठी पालिका आयुक्तांचा आग्रह असून याला भाजपाचाही पाठिंबा आहे. पण मुंबईतील रस्ते व चौकांना भारतीय नेत्याचे अथवा प्रतिष्ठीत व्यक्तीचेच नाव द्यायला हवे, असे मत, शिवसेनेसह काँग्रेस, समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. त्यामुळे या चौकाचे नामकरण वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता आहे.

काळा घोडा येथील चौकाला इस्त्रायलचे माजी पंतप्रधान शिमॉन पेरेज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंगळवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गटनेत्यांच्या मंजुरीसाठी सादर केला होता. 

मुंबईतील पूल, चौक, एवढेच नाही तर रेल्वे स्टेशनला देण्यात आलेली विदेशी नावे बदलून तेथे भारतीय नावे देण्यात येत आहेत. असे असताना इस्त्रायल पंतप्रधानांचे चौकाला नाव देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी सादर करून, नवा वाद निर्माण केला आहे. काळा घोडा चौकाच्या नामकरणावरून होणारा वाद लक्षात घेऊन, मंगळवारी गटनेत्यांच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला प्रस्ताव महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी निर्णय न घेता पुढे ढकलला. दरम्यान काळा घोडा चौकाला इस्त्रायल पंतप्राधानांचे नाव देण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले.