Sun, Aug 25, 2019 20:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोशल मीडियावर आंबेडकर विरुद्ध आठवले

सोशल मीडियावर आंबेडकर विरुद्ध आठवले

Published On: Jan 14 2018 11:05AM | Last Updated: Jan 14 2018 3:00PM

बुकमार्क करा
मुंबई : खलील गिरकर

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला द्विशतक वर्षानिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित समाजाच्या नागरिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात बंद पाळण्यात आला. या प्रकरणाचे कवित्व अद्याप सुरू असताना आंबेडकरी समाजाचे नेते असलेल्या प्रकाश आंबेडकर व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर जोरदार वॉर सुरू झाले आहे. दोन्ही गटांचे समर्थक आपल्याच नेत्याची बाजू कशी योग्य आहे व विरोधी गटाच्या नेत्याची बाजू कशी अयोग्य आहे, हे दाखवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

महाराष्ट्र बंदला दलित समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या बंदचे आवाहन करणार्‍या प्रकाश आंबेडकरांना त्याचे श्रेय मिळाल्याची चर्चा झाली. त्यामुळे आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने देखील श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला. दलित समाजात राज्यात तळागाळात पोहोचलेले गट म्हणून रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांचे नाव घेतले जाते. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर झालेल्या बंदचे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले व केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या आठवलेंना थेट सक्रिय भूमिका घेणे शक्य झाले नाही. 3 जानेवारीला ज्यावेळी राज्यात दलित समाज रस्त्यावर उतरलेला होता. त्यावेळी आठवलेंच्या जीवनावरील पुस्तकाचे दिल्लीमध्ये उप राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन होत होते. त्यामुळे समाजात नाराजीचे सूर उमटले होते. बदललेल्या परिस्थितीमध्ये समाजाचा पाठिंबा घटण्याची भीती लक्षात येताच आठवलेंनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व दलित समाजाच्या नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा समोर करत कार्यवाही करण्याची मागणी केली. दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी देखील या प्रकरणानंतर सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन व मुख्यमंत्र्यांना भेटून कारवाईची मागणी केली होती.

फेसबुक आघाडीवर

फेसबुकच्या माध्यमातून हा वाद मोठ्या प्रमाणावर उफाळला गेला आहे. आंबेडकर व आठवले समर्थक आपापल्या नेत्यांची बाजू कशी योग्य आहे व त्यांनी समाजासाठी या प्रकरणात व यापूर्वीच्या प्रकरणात काय काय केले आहे, याची उजळणी करू लागले आहेत. आठवले जरी एकीकरणाची भाषा करत असले तरी आंबेडकर यांनी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही.

तिखट भाषेत प्रत्युत्तर

अनेकदा समान ग्रुपमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांच्या पोस्टला विरोधी गटाकडून तिखट भाषेत प्रत्युत्तर दिले जात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अनेकदा हा वाद सोशल मीडियापर्यंतच न राहता आभासी जगातून खर्‍या जगापर्यंत येऊ लागला आहे. त्यामुळे दलित समाजातील जाणकारांनी हा वाद मिटवून सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन तरुणाईला केले आहे.

वाचा संबंधित बातम्या

अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांचा धोकाः आंबेडकर

कोरेगाव भीमाच्या घटनेमागे मराठा संघटनांचा हात: रामदास आठवले 

दलितांचा राजा होतो; पुढेही राहीन : अ‍ॅड. आंबेडकर

प्रकाश आंबेडकर राजे..आठवलेंचे जोरदार प्रत्युत्तर