होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिसमिल्‍ला भट कॉलेजकडून ४९ विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा

बिसमिल्‍ला भट कॉलेजकडून ४९ विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:09AM

बुकमार्क करा

टिटवाळा : वार्ताहर 

कल्याण तालुक्यातील खडवली येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या बिसमिल्ला भट ऑफ फार्मसी या कॉलेजकडून 49 विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विद्यार्थी व पालकांनी सोमवारी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी संस्थाचालक अज्जीमुद्दीन बिसमिल्ला शेख (22), महमंद इजाजउद्दीन जमालउद्दीन रहेमानी (28) महंमद कलीम महमंद याकूब शेख (28, सर्व राहणार वडाळा व अ‍ॅन्टॉप हिल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत महमंद इजाजउद्दीन रहेमानी आणि महंमद कलीम शेख यांना ताब्यात घेतले आहे. 

जुलै 2017 मध्ये विविध मराठी, हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रात फार्मासिटीकल काऊन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असल्याचे सांगून बिसमिल्ला भट कॉलेज ऑफ फार्मसीची जाहिरात देण्यात आली. त्यानुसार कॉलेजमध्ये 49 विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिशन करून घेण्यात आले. याकामी 1 लाख 60 हजार रुपयांची वार्षिक फी सांगण्यात आली. काही पालकांनी विनंती केली असता काहींना एक लाख दहा हजार, वीस हजार अशा प्रकारे अ‍ॅडमिशन देण्यात आले. याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून एक लाख, पन्नास, चाळीस, तीस अशा प्रकारच्या रकमा घेऊन लाखो रूपये गोळा करण्यात आले. 

येथे जवळपास 15 शिक्षक व इतर कर्मचारी काम करत होते. चार महिने येथील कारभार व्यवस्थित चालवण्यात आला. परंतु गेल्या पाच दिवसांपासून हे कॉलेज बंद झाल्याचे विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांना सोबत घेऊन टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पालक अकील मोहमद्दी सिध्दीकी पटेेल यांंच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संस्थाचालकासह अन्य दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानुसार उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पो. नि. योगेश गुरव, पो.उप.नि. .बी.अहिरराव तपास करीत आहेत.