ऐरोली : प्रतिनिधी
ऐरोलीच्या खाडीकिनारा गेल्या काही दिवसांपासून परदेशी पाहुण्यांच्या किलबिलाटाने बहरून गेला आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिना सुरू होताच युरोप, लडाख या ठिकाणाहून पक्ष्यांचे आगमन सुरू होत असते. फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या अखेरीस हे पक्षी परतीच्या प्रवासास सुरुवात करतात. या वर्षीदेखील पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.
ठाणे खाडीतील काही भाग हा फ्लेमींगोसाठी संरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात परवानगी शिवाय जाता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी माणसांचा वावर कमी झाला आहे. परिणामी ठाणे खाडी परिसरात दिवसेंदिवस फ्लेमींगोचा वावर वाढत असल्याची नोंद पर्यावरण दक्षता मंचचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी केली. खाडीत जैवसृष्टी वाढविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल ठाणे महापालिकेने उचलले आहे. विशेष करुन खारफुटी संवर्धन आणि सांडपाण्यावर प्रक्रियाकरुन खाडीत सोडले जाणार्या पाण्यामुळे सध्या जलचरांची संख्या वाढून हजारो पक्ष्यांचे थवे या परिसरात दिसत आहेत.