Sun, May 26, 2019 12:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेकडो परदेशी पाहुण्यांनी बहरली कल्याणची खाडी !

शेकडो परदेशी पाहुण्यांनी बहरली कल्याणची खाडी !

Published On: Jan 11 2018 1:31AM | Last Updated: Jan 11 2018 12:42AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

सध्या कल्याणची खाडी परदेशी पाहुण्यांच्या आगमनाने फुलून गेली आहे. हजारो किलोमीटरचा पल्ला पार करुन आलेल्या या सुंदर परदेशी पाहुण्यांना बघण्यासाठी आणि आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होत आहे. कल्याण-भिवंडीला जोडणार्‍या पुलावर या पाहुण्यांची शेव-गाठी खाण्यासाठी धांदल उडत असते. पांढराशुभ्र रंग आणि काळेभोर बोलके डोळे असलेल्या या परदेशी पाहुण्यांच्या प्रेमात कोणी नाही पडले तर नवलच... पण हे परदेशी पाहुणे म्हणजे कोणी व्यक्ती नसून ते आहेत ‘सी गल’ नावाचे पक्षी. 

अमेरिका व युरोपात आढळणारे हे पक्षी दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरच्या काळात हजारो किलोमीटरचा प्रवास करून कल्याणच्या खाडीत येत असतात. पांढरा शुभ्र आणि पंखांवर करडा रंग, लांबसडक पंख, लालसर-काळ्या रंगाची चोच आणि लालसर रंगाचे बदकासारखे पाय असणारे हे शेकडो पक्षी सध्या कल्याणच्या खाडीत आले आहेत. खाडीच्या पाण्यात बसलेले असताना जणू काही पांढरी शुभ्र फुलांची माळच खाडीच्या पाण्यावर अंथरल्याचा भास होत आहे. अनेकदा एक-एक करून आकाशात थव्याने झेपवतानाचे विहंगम दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. 

या मार्गावरून प्रवास करणारे अनेक नागरिक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ त्यांना खाण्यासाठी टाकत असतात. मात्र या ‘सी गल’च्या जिभेला शेव-गाठीची चटक लागली आहे. शेव-गाठी हा पदार्थ जणू त्यांचा जीव की प्राण झाला आहे. कोणी हा पदार्थ खायला टाकला रे टाकला की त्यावर हे पाहुणे तुटून पडतात. मग त्यावर अक्षरशः ताव मारत अवघ्या काही मिनिटात हा पदार्थ फस्त केला जातो.