Tue, Oct 22, 2019 02:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हाडे जोडण्यासाठी जैविक घटकांचा स्क्रू ठरेल वरदान

हाडे जोडण्यासाठी जैविक घटकांचा स्क्रू ठरेल वरदान

Published On: Jul 12 2019 1:53AM | Last Updated: Jul 12 2019 1:19AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एखाद्या दुर्घटनेनंतर हाडे जोडण्यासाठी आजवर धातुचे स्कू्र वापरण्यात येत होते. मात्र लवकरच जैविक घटकांपासून तयार केलेला आणि संपूर्ण स्वदेशी बायोडिग्रेडेबल स्क्रू अस्थिरोगतज्ञ वापरतील. स्वस्त आणि सुरक्षित असलेल्या या स्क्रूचा अविष्कार आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केला आहे. या स्क्रूचा वापर केल्यामुळे संसर्गाचा धोकाही टळणार आहे. सद्यस्थितीत आयात केलेले महागडे स्क्रू अस्थिच्या शस्त्रक्रियांसाठी वापरले जातात. मात्र जैविक घटकांपासून तयार केलेल्या स्क्रूमुळे शस्त्रक्रियेच्या जखमा लवकर भरून येतील. तसेच  हे स्क्रू जैविक असल्याने त्यांना काढण्याची गरजही भासणार नाही.

आयआयटीचे संशोधक अजय सुर्यवंशी, कुणाल खन्ना, सिंधू के. आर., जयेश बेलोरे आणि रोहित श्रीवास्तव यांनी या स्क्रूची निर्मिती केली आहे. यात मॅग्नेशियम ऑक्साईड आणि सिल्क या जैविक घटकांचा समावेश आहे. या संशोधनासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने अर्थसहाय्य केले असून हे संशोधन बायोमेडिकल जर्नलच्या अंकात प्रसिध्द झाले आहे. व्यावसायिक स्तरावर वापर करणे तसेच त्याचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

डॉक्टर आणि संशोधक काय म्हणतात...

रोहीत श्रीवास्तव हे आयआयटीच्या बायोसायन्स अ‍ॅड बायोइंजिनियरिंग विभागात संशोधक आहेत. ते म्हणाले, सद्या हाडांची शस्त्रक्रिया करतांना वापरण्यात येणार्‍या आयातीत स्क्रूची किंमत प्रत्येकी 15 ते 16  हजार असून एका शस्त्रक्रियेसाठी किमान तीन स्क्रूची आवश्यकता असते. त्यामुळे शस्त्रक्रियेची किंमतही वाढते. मात्र जैविक पध्दतीचे स्वस्त स्क्रू उपलब्ध झाल्यास त्याचा सर्वांनाच लाभ होईल. अजय सूर्यवंशी म्हणाले, आयातीत धातुच्या स्क्रूला नंतर काढावे लागते. मात्र हा जैविक स्क्रू शस्त्रक्रियेनंतर काढण्याची गरज नाही. तसेच झपाट्याने जखम भरू न निघेल. ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. हिंदुजा हॉस्पिटलचे अस्थिरोग सर्जन डॉ. संजय अगरवाला म्हणाले, ऑपरेशननंतर जखम भरून निघण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागतो. मात्र जैविक स्क्रू परिणामकारक ठरणार असल्याचे दिसते.  बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजचे डॉ. दिनेश लोखंडे म्हणाले, जैविक स्क्रू आपोआप विरघळणार आहेत. त्यामुळे त्यांना काढण्याची गरज पडणार नाही. हे स्क्रू रुग्ण आणि सर्जनांसाठीही फायदेशीर ठरतील.
 WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19