Sun, Mar 24, 2019 23:40
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिल्डरहो तुमच्यासाठी!

बिल्डरहो तुमच्यासाठी!

Published On: Dec 13 2017 2:30AM | Last Updated: Dec 13 2017 2:04AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

बिल्डरांच्या फायद्यासाठी 33(7) कायद्याचा गैरवापर होताना दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागेतील इमारती धोकादायक घोषित करून, त्याच्या पुनर्विकासाचे काम या कायद्यांतर्गत आपल्या मर्जीतील बिल्डरांना देण्यात येत आहे. याला सुधार समितीमधील सत्ताधारी शिवसेनेचीही अप्रत्यक्षरित्या साथ मिळत आहे. 

 मुंबई महापालिकेच्या भूखंडावर उभ्या असलेल्या इमारतींचा 33(7) अंतर्गत पुनर्विकास करण्यात येतो. पण यासाठी त्या भूखंडावर असलेली इमारत धोकादायक घोषित करणे आवश्यक आहे. अशा इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी बिल्डराची नेमणूक करून त्याला 5 एफएसआय देण्यात येतो. त्यामुळे बिल्डरांचा कल पालिकेच्या इमारतींच्या पुनर्विकासाकडे झुकू लागला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांना हाताशी धरून धोकादायक नसलेल्या इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. कुर्ला पश्‍चिम येथील सदगुरू साईनाथ मंडळ, श्रीकृष्ण चौक 180 टेनामेंट असलेल्या इमारतीला घोषित करून तेथील 200 कुटुंबांना माहूलला पाठवण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप राजा यांनी केला. रहिवाशी इमारत रिखामी करत नसल्यामुळे पालिकेने त्यांच्या घरातील जलजोडणी व विज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी पालिकेने विज व जलजोडणी कापण्याचा प्रयत्न केला असता, रहिवाशांच्या विरोधामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. 

या इमारतीची 2009-10 मध्ये 3 कोटी रुपये खर्च करून दुरूस्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्या इमारतीचे आर्युमान 10 ते 12 वर्षांनी वाढले. पण पालिकेच्या मालमत्ता विभागाने अवघ्या 3 ते 4 वर्षात या इमारतीला सी-1 म्हणजेच अतिधोकादायक म्हणून घोषित केले. यामागे एका मोठ्या बिल्डरचा हात असल्याचा आरोप राजा यांनी केला आहे. मुंबईत अशाच प्रकारे इमारती धोकादायक घोषित करण्यात सपाटा लावण्यात आला आहे. यात जीटीबी नगर, शिवडी क्रॉस रोड येथील इमारतींचा समावेश आहे. केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी 33(7) चा गैरवापर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याची चौकशी करावी, अशी मागणीही राजा यांनी केली आहे.