Fri, Apr 26, 2019 15:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील भाडेपट्टाधारकांना मोठा दिलासा

मुंबईतील भाडेपट्टाधारकांना मोठा दिलासा

Published On: Apr 25 2018 2:03AM | Last Updated: Apr 25 2018 2:03AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनींच्या नूतनीकरणाच्या धोरणात बदल करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयानुसार भाडेपट्ट्यांच्या नुतनीकरणाचे दर कमी करण्यात आल्याने भाडेपट्टाधारकांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील हजारो भूखंड भाडेपट्ट्याने दिले आहेत. त्यांचे नूतनीकरणाबाबत 12 डिसेंबर 2012 रोजी धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार भाडेपट्ट्यावरील जमिनींचे मूल्य ठरविताना रेडी रेकनरचा वापर करण्यात येतो. प्रचलित रेडी रेकनरनुसार येणार्‍या किंमतीच्या 25 टक्के रकमेवर निवासी प्रयोजनासाठी 2 टक्के, औद्योगिक प्रयोजनासाठी 4 टक्के, वाणिज्यिक प्रयोजनासाठी 5 टक्के, निवासी व वाणिज्यिक या मिश्र प्रयोजनासाठी 5 टक्के या दराने भाडेपट्ट्याची आकारणी करण्यात येते. 

जमिनींच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने भूईभाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, त्याप्रमाणात भाडेपट्टाधारकांच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. त्यामुळे भुईभाडे कमी करण्याची होणारी मागणी लक्षात घेऊन भाडेपट्ट्यांच्या दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात व्यक्तिगत निवासी वापरासाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या 500 चौरस मीटर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करताना रेडी रेकनरप्रमाणे जमिनीच्या किंमतीच्या 25 टक्के रकमेवर 1 टक्के इतके वार्षिक भूईभाडे आकारणी करण्यात येईल. सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवासी वापरासाठी दिलेल्या शासकीय भूखंडांच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करताना 1 टक्के इतके वार्षिक भूईभाडे आकारण्यात येणार आहे.

Tags : Big relief for the leaseholders of Mumbai