होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यापीठाच्या परीक्षाशुल्कात मोठी कपात

विद्यापीठाच्या परीक्षाशुल्कात मोठी कपात

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:22AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेत परीक्षाशुल्कात मोठी कपात केली आहे. 11 डिसेंबर 2017 ला पार पडलेल्या विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये परीक्षा शुल्क कमी करण्याचा ठराव करण्यात आला आहे. यानुसार शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या प्रथम सत्रापासून (उन्हाळी परीक्षा) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून परीक्षाशुल्कात वाढ केली होती. या वाढीव परीक्षाशुल्काबाबत फेरविचार व्हावा यासाठी अधिष्ठाता मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार, 25 ऑक्टोबर 2017 रोजीच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर तपशीलवार चर्चा करण्यात आली आणि परीक्षा शुल्कात कपात करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेने या प्रस्तावावर चर्चा करून वाढीव परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

या ठरावाच्या अनुषंगाने सर्वसाधारणपणे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेच्या शुल्कात 10 टक्के एवढी कपात करण्यात आली आहे. तर, पदवी परीक्षेसाठी विषयनिहाय एका विषयासाठी परीक्षेला प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्याला आधी 1000 रुपये शुल्क अदा करावे लागत होते. त्यात 80 टक्के एवढी भरघोस कपात करुन आता फक्त 200 रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे. तर पदव्युत्तर परीक्षेला एका विषयासाठी प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्याला आधी 1500 रुपये शुल्क अदा करावे लागत होते. त्यात 73 टक्के एवढी कपात करण्यात आली असून आता फक्त 400 रुपयेशुल्क अदा करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे पदवीसाठी दोन विषय घेऊन परीक्षेला प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्याला आधी 1000 रुपये शुल्क अदा करावे लागत होते. त्यामध्ये 60 टक्के एवढी कपात करण्यात आली असून आता 400 रुपये एवढे शुल्क अदा करावे लागणार आहे. 

पदव्युत्तर परीक्षेसाठी दोन विषयाला आधी 1500 रुपये एवढे शुल्क अदा करावे लागत होते त्यामध्ये 53 टक्के एवढी कपात करण्यात आली असून आता 700 रुपये एवढे शुल्क अदा करावे लागणार आहे. तसेच तीन किंवा अधिक विषयांसाठी आणि नवीन विद्यार्थी पदवीच्या परीक्षेला प्रविष्ठ होणार असतील त्या शुल्कामध्ये 10 टक्के एवढी कपात करण्यात आली असून आता पदवीच्या परीक्षेला प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्याला 900 रुपये शुल्क अदा करावे लागणार. पदव्युत्तर परीक्षेला प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्याला 1500 रुपये ऐवजी 1350 रुपये एवढे शुल्क अदा करावे लागणार आहेत.

परीक्षा शुल्कातील ही कपात प्रथम सत्र (उन्हाळी) परीक्षा 2018 पासून लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रथम सत्र (उन्हाळी) परीक्षा 2019 पासून परीक्षा शुल्कात दरवर्षी 5 टक्के दराने शुल्क वाढ करण्यात यावी असेही विद्वत आणि व्यवस्थापन परिषदेने ठरविले आहे.