होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेनाप्रमुखांचे व्यक्‍तिमत्व एका चित्रपटात सामावणारे नाही

सेनाप्रमुखांचे व्यक्‍तिमत्व एका चित्रपटात सामावणारे नाही

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 22 2017 1:28AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महान कार्य, त्यांचा जीवनप्रवास तीन तासांच्या चित्रपटामध्ये सिमीत करता नाही येणार, त्याच्या सात-आठ भागांमध्ये सीडी तयार करावी किंवा वेबसीरिज काढावी, अशी सूचना बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली. बाळासाहेब ठाकरेंवर नवाझुद्दीन सिद्दीकी या कलाकाराने साकारलेल्या ठाकरे चित्रपटाचा टीझर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लाँच झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

शिवसेना प्रमुखांशी माझे कौटुंबिक संबध होते. माझ्यावरील प्रत्येक प्रसंगावेळी त्यांनी माझी पाठराखण केली. माझ्या लग्नानंतर त्यांनी आम्हाला घरी बोलावले आणि त्यावेळी आईने जयाचे केलेले स्वागत मी कधीच विसरणार नाही. अगदी स्वत:च्या सुनेप्रमाणेच त्यांनी तिचे स्वागत केले. त्याक्षणापासून आपण बाळासाहेबांना वडिलांच्या ठिकाणी मानू लागलो, असे बच्चन यावेळी म्हणाले.

कुली चित्रपटाची शूटिंग सुरू असताना आपल्याला अपघात झाला असताना मी बेशुध्द होतो. त्यानंतर उपचारासाठी मुंबईत आणण्याचा निर्णय झाला. त्यावेळी पावसामुळे विमानतळावर अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नव्हती. शेवटी शिवसेनेची अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, अशी आठवण त्यांनी अगदी भाऊक होत सांगितली. या चित्रपटासाठी वाट्टेल ती मदत करण्याची तयारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सांताक्रुझच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. 

बाळासाहेबांवरील हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत बनणार आहे. ठाकरे असे या बायोपिकचे नाव असणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनसेचे नेते अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

‘हा चित्रपट केवळ आपल्या वडिलांच्या जीवनावर नाही तर इतिहास घडवणार्‍या एका महान नेत्यावर आहे, असे उद्गगार उध्दव ठाकरे यांनी यावेळी काढले. दरम्यान, मार्च 2018 मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होणार असून बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारी 2019 ला हा प्रदर्शित होणार आहे.