Wed, Aug 21, 2019 19:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिद्रे प्रकरणाची चौकशी पुन्हा अल्फान्सोंकडे

बिद्रे प्रकरणाची चौकशी पुन्हा अल्फान्सोंकडे

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 12:57AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे या अचानक गायब होऊन त्यापाठीमागचे गूढ वाढले असतानाच या प्रकरणाची चौकशी करणार्‍या उपपोलीस अधिक्षक संगिता अल्फान्सो यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली होती. मात्र, ही बदली रद्द करून त्यांच्याकडे परत बिद्रे प्रकरणाची चौकशी सोपवण्याबाबत  बिद्रे यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या या प्रयत्नाना यश येऊन अल्फान्सो यांची अवघ्या तीन महिन्यात परत नवी मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे बिद्रे प्रकरणाच्या चौकशीचे काम सोपवण्यात आले आहे.   

अल्फान्सो या जुलै, 2017 पर्यंत बिद्रे यांच्या प्रकरणाची चौकशी करीत होत्या. पण, त्यानंतर त्यांना पोलीस उपअधिक्षक पदावर बढती देऊन लातूर येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर  त्यांची कोकण भवन येथील जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली होती.  पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार अल्फान्सो यांची अश्‍विनी बिद्रे प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आता या चौकशी प्रकरणात प्रकाश निलेवाड यांना सहाय्य करतील. याबाबत अल्फान्सो यांनी सांगितले आहे, की त्या तीन दिवसांपूर्वी येथे हजर झाल्या आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व एकनाथ खडसे यांचे पुतणे ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजेश यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. 

आरोपींच्या जामिनासाठी आम्ही अर्ज केला नसल्याची माहिती अभय कुरुंदकर यांचे वकील विशाल भानुशाली यांनी  दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी पक्षाकडून कुरुंदकर यांच्या ब्रेन मॅपींग, नार्कोटेस्ट व पॉलीग्राफ चाचणीसाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. परंतु, कायदेशीर तरतुदीनुसार संबंधीत व्यक्तीने परवानगी दिल्याशिवाय अशी कोणतीही चाचणी करता येत नाही.  या प्रकरणाची पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी होणार आहे.