Mon, Aug 19, 2019 17:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रोच्या प्रवाशांना सायकलची सोय

मेट्रोच्या प्रवाशांना सायकलची सोय

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 1:25AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शहरातील वाहतूक  कोंडी आणि वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणावर मात करण्यासाठी आता मेट्रोनेही कंबर कसली आहे. स्थानकातून बाहरे पडल्यानंतर प्रवाशांना थेट त्यांच्या घरी जाण्यासाठी मेट्रोतर्फे जीपीएस तंत्रज्ञान असलेली विदेशी सायकल उपलब्ध करून देणार आहे. प्रायोगिक तत्वावर नागपूर आणि पुण्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मुंबईतील वांद्रे - कुर्ला संकुलात सुरू असलेल्या मॅग्नेटीक महाराष्ट्र प्रदर्शनात महामेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने अशा प्रकारची सायकल मांडली आहे. एमएमआरसीएलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सुशील कुमार म्हणाले सिंगापूर, जपान, मलेशिया, यूएस, चीन, यूके, इटली, थायलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, नेदरलँड, जर्मनी आणि फ्रान्समध्ये मेट्रो प्रवाशांसाठी अशा प्रकारची सुविधा आहे. त्यानुसार आता नागपूर  आणि पुण्यातही जीपीएस तंत्रज्ञानयुक्त सायकल सेवा सुरू होणार आहे.

पहिल्या टप्प्यात ही सेवा एका मेट्रो स्थानकापासून ते दुसर्‍या स्थानकापर्यंत असेल. त्यानंतर ही सेवा शहरात उपलब्ध केली जाईल. मेट्रो स्थानकाबाहेरुन कार्यालय, बाजारपेठ इतकेच नाहीतर स्वतःच्या घरापर्यंत प्रवाशाला सायकल नेता येईल. एमएमआरसीएल या सेवेसाठी महाकार्ड उपलब्ध करून देईल. सुरुवातीला या सायकल्स सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी उभ्या केल्या जातील. मेट्रोने स्वतःचे स्टँण्ड तयार केल्यानंतर त्या हलविल्या जातील. राज्यातील ओला व उबेरच्या सेवेप्रमाणे मेट्रोच्या प्रवाशांनीही सर्च केल्यानंतर सायकल कुठे उभी आहे, हे समजेल. तेथे जाऊन प्रवासी ती सायकल ताब्यात घेऊन मेट्रो स्थानकांपर्यंत येतील. 

जीपीएस प्रणालीयुक्त या सायकिलमध्ये ऑटोमेटिक लॉक सिस्टम आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर लॉक उघडेल. या सायकल सेवेसाठी भाडे निश्‍चित करण्यात आले नाही. मात्र, सर्वसामान्याना परवडेल असे भाडे आकारले जाईल. मार्चमध्ये नागपुरात मेट्रो सुरू होईल. त्यापूर्वी  एमएमआरसीएलची समिती भाडे निश्‍चित करणार आहे.