Tue, Apr 23, 2019 06:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात

भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात

Published On: May 03 2018 1:42AM | Last Updated: May 03 2018 1:33AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य प्रशासनातील 27 वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांची पाच वर्षानंतर बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यांच्या जागी वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. सिडकोचे नवे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून दिल्लीत महाराष्ट्र सदनचा कार्यभार सांभाळणारे लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेली पाच वर्षे एमएमआरडीएचे आयुक्त म्हणून युपीएस मदान यांच्याकडे कार्यभार होता. या महत्वाच्या प्राधिकरणावर दीर्घकाळ रहाणारे मदान हे पहिलेच आयुक्त ठरले आहेत. आता त्यांच्या जागी धडाडीचे व कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेल्या आर. ए. राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमएमआरडीएचे अनेक प्रकल्प सुरु असून निवडणुकीपूर्वी या प्रकल्पांना गती देण्याची जबाबदारी राजीव यांच्यावर टाकण्यात आली आहे. 

म्हाडाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे यांची वित्त विभागात सहसचिवपदी बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी दिपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बी. जी. पवार यांची मिरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीनंतर काही दिवसातच भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी त्यांची खटके उडाल्याने त्यांची बदली करण्यात आली होती. आता त्यांना जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. 

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी झालेली बदली रद्द करावी लागली होती. आता त्यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, सध्या तेथे विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे हा बदली आदेश निवडणुकीनंतर अमलात येण्याची शक्यता आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Bhushan Gagrani,   Chief Minister Office,