Wed, Jul 17, 2019 11:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळांची २० कोटींची मालमत्ता जप्त

भुजबळांची २० कोटींची मालमत्ता जप्त

Published On: Dec 06 2017 1:54AM | Last Updated: Dec 06 2017 1:49AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह अनेक गैरव्यवहारांत मनी लॉण्डरिंग कायद्याखाली अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह गुन्ह्यातील आरोपींची तब्बल 20.42 कोटींची मालमत्ता जप्त करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणखी एक दणका दिला आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकमधील फ्लॅट, कार्यालये आणि बंगला अशा पाच मालमत्तांचा यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणात 178 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

गेली पावणे दोन वर्षे कारागृहात असलेल्या भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याचे (पीएमएलए) कलम 45 घटनाबाह्य ठरवल्यानंतर सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केलेल्या जामीनअर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम़  एस़  आझमी यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली.

मनी लॉण्डरिंग कायद्याचे (पीएमएलए) कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी त्याआधारे भुजबळांना जामीन देता येणार नाही़  त्यांना आपण गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे लागेल, ईडीच्यावतीने असा युक्तीवाद करत अ‍ॅड. हितेंद्र वेणेगावकर यांनी भुजबळांच्या जामिनाला जोरदार विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या तरतुदींमध्ये भुजबळांचा जामीन अर्ज असंवैधानिक ठरतो. तसेच बेहिशोबी मालमत्ता गोळा केलेल्या त्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही, असा अ‍ॅड. वेणेगावकर यांनी दावा केला. या अर्जावरील सुनावणी अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने अर्जाची सुनावणी गुरुवार 7 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.