Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळ यांना केईएम रुग्णालयात हलवले

भुजबळ यांना केईएम रुग्णालयात हलवले

Published On: Mar 14 2018 1:32AM | Last Updated: Mar 14 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना अखेर जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज देत केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेजे रुग्णालयात गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने त्यांना केईएममध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

छगन भुजबळ यांना केईएममध्ये हिपॅटोपॅनक्रिअ‍ॅटोबिलिअरी विभागात दाखल करण्यात आले आहे. जेजे हॉस्पिटलमध्ये हा विभाग उपलब्ध नाही. शिवाय जेजेत गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभागही उपलब्ध नाही. आर्थर रोड जेल प्रशासन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगी दिल्यानंतर छगन भुजबळ यांना पोटावरील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या वॉर्ड क्रमांक 43 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

भुजबळ यांच्या स्वादुपिंडाला संसर्ग झाल्याने त्यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे चाचण्यांवरून समोर आले होते. या त्रासामुळे त्यांना श्वास घेण्यासही थोडा त्रास होत आहे .त्यामुळे भुजबळ यांना कार्डिअ‍ॅक केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. जेजे रुग्णालयात हिपॅटोपॅनक्रिअ‍ॅटोबिलिअरी (एसपीबी) आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभाग उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयाच्या हिपॅटोपॅनक्रिअ‍ॅटोबिलिअरी विभागात दाखल करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यांचे वय 71 वर्षे असून ते गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत, हीच अपेक्षा आहे. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे. योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचे सरकार जबाबदार असेल असेही त्यांनी बजावले होते.