होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळांचा केईएममधील मुक्काम वाढला

भुजबळांचा केईएममधील मुक्काम वाढला

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी त्यांचा केईएम रुग्णालयातील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला असल्याची सुत्रांकडून मिळाली. भुजबळ स्वादूपिंडाच्या आजाराने त्रस्त असून ते आता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकणार आहेत. दरम्यान, भुजबळ हे सोमवारी सकाळी फेसबूक लाईव्हद्वारे सर्मथकांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र तोे रद्द करण्यात आला.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी काळ्या पैशांच्या कायद्याखाली अटकेत असलेल्या छगन भुजबळांनी जामीन मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम रद्द केले आणि त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करावी, अशी मागणी भुजबळ यांनी न्यायालयाकडे केली.

भुजबळांचे वय लक्षात उच्च न्यायालयाने त्यांना पाच लाखांचा जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडू नये, बोलावण्यात येईल तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, गुन्ह्यातील साक्षीदारांना प्रभावित न करणे, अशा अटींवर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.