Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलुंडला सेनेच्या शिवजयंतीला भोजपुरी ठुमके!

मुलुंडला सेनेच्या शिवजयंतीला भोजपुरी ठुमके!

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:12AMभांडुप : वार्ताहर

भांडुप पश्‍चिमेत शिवसेनेचे उपशाखाप्रमुख राजू मगर यांनी सोमवारी आयोजित केलेल्या शिवजयंतीला चक्‍क शिवसैनिकांनी भोजपूरी महिला कलाकारांवर पैसे उडवले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून सेनेच्या पदाधिकार्‍यांवर टिकेची झोड उठू लागली आहे.

वीर संभाजी भाजी मार्केट येथे झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर कलाकारांनी बीभत्स नृत्य सादर केले.एवढेच नाहीतर काही प्रेक्षकांनी गाण्याच्या स्टेजवर जाऊन महिला कलाकारांवर पैसे उधळले. तेथेच छत्रपती शिवाजी महाराजांचे फ्लेक्स देखील लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेतर्फे सत्यनारायणाच्या महापूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडल्याने  शिवसेनेला लक्ष केले जात असल्याने हा कार्यक्रम शिवजयंतीच्या दुसर्‍या दिवशी झाला अशी आयोजकांकडून सारवासारव सुरु आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यावेळी उपस्थित नसल्याने याबाबतची माहिती नाही. अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल करुन आमची बदनामी सुरु आहे. याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उपशाखाप्रमुख व आयोजक राजू मगर यांनी म्हटले आहे.