Fri, Jul 19, 2019 20:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत विवाहितेची गळा चिरून हत्या 

भिवंडीत विवाहितेची गळा चिरून हत्या 

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 12:30AMभिवंडी : प्रतिनिधी

भिवंडी शहरातील कामतघर विभागातील चौधरी कम्पाऊंड परिसरातील एका इमारतीमध्ये मालती विनोद झा (52) या विवाहितेची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेचा पती घरातून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने अधिक तपास करीत आहेत.

येथील अष्टविनायक को. ऑप हाऊसिंग सोसायटीमधील पाचव्या मजल्यावर विनोद झा पत्नी मालती, मुलगा प्रकाश, आई कौसल्यादेवी यांसह राहतो. गुरुवारी सकाळी मालती ही मंदिरात तर कौसल्या या पार्कमध्ये फिरण्यासाठी एकत्रित घरातून बाहेर पडल्या होत्या. कौसल्या या घरी परतल्या असता त्यांना घराचा दरवाजा बंद असल्याचे आढळले. मालती घरी आली नाही म्हणून त्या शेजारील कुटुंबीयांकडे बसून राहिल्या. परंतु एक तास होऊन सुद्धा मालती न आल्याने कौसल्याने नातू प्रकाश यास फोन करून बोलावून घेतले. त्याने आपल्याकडील दुसर्‍या चावीने घराचा दरवाजा उघडला असता मालती रक्ताच्या थारोळ्यात निपचित होऊन पडलेली दिसली. वडील विनोद झा हे घरात न दिसल्याने प्रकाश याने वडिलांना मोबाईल केला असता त्यांचा मोबाईल घरातच आढळून आला. प्रकाश याने नारपोली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता घराच्या मुख्य खोलीत सर्वत्र रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर उडाल्याच्या आढळून आल्या. परंतु घरातील सर्व मौल्यवान चीजवस्तू जागेवर असल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने नसून दुसर्‍या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाले. 

Tags : Mumbai news, Bhiwandi, married Woman, murder,