होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 12:30AMभिवंडी : वार्ताहर 

भिवंडी महापालिका हद्दीतील ताडाळी भागात असलेल्या श्री खाटुशाम मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी तीन ते चार लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. सकाळी मंदिराचे पुजारी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत. 

ताडाळी भागातील ठाकर्‍याचा पाडा रस्त्यालगत शहरातील गुजराथी व राजस्थानी नागरिकांचे आराध्यदैवत श्री खाटुशाम यांचे मंदिर आहे. 7 फेब्रुवारी रोजी त्याची प्राणप्रतिष्ठा केली होती. या ठिकाणी रोज असंख्य भाविक येत असतात. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास चोरट्याने भिंतीवर चढून खिडकीचे ग्रील उचकटून मंदिरात प्रवेश केला. तसेच देवासमोर असलेल्या दोन दानपेट्यांची कुलूपे तोडून त्यामधील रक्कम आपल्या शर्टात बांधून तेथून पोबारा केला. 

सकाळी मंदिरातील पुजारी त्याठिकाणी आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांनी ही बाब मंदिराच्या विश्वस्तांना सांगितल्यावर त्यांनी स्थानिक कोनगाव पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मंदिरातील सीसीटीव्ही तपासले असता मंदिरात घुसलेला चोरटा हा एकटाच असून तब्बल दीड तास मंदिर परिसरात राहून त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. 
 या ठिकाणी भेट दिलेले शाम अग्रवाल यांनी पोलीस प्रशासन भिवंडी शहरात नक्की काय करत आहे, अशी शंका उपस्थित करुन पोलिसांच्या रात्र गस्तीपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शहरात सर्व पोलीस स्टेशनअंतर्गत दोन दोन गस्त पथकांसह बिट मार्शल तैनात असताना शहरातील चोरट्यांचा वावर हा पोलिसांना कसा दिसत नाही,असा आरोप करत या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने दानपेटीमधील सुमारे तीन ते चार लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याची माहिती दिली. 
 

 

tags ; Bhiwandi,news, khatusama, temple, donation, box, Theft,Type,