Fri, May 24, 2019 21:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इमारत कोसळून भिवंडीत ३ ठार

इमारत कोसळून भिवंडीत ३ ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भिवंडी : वार्ताहर 

भिवंडी महापालिका हद्दीतील नवीवस्ती येथील कोरी बंगाल नावाची चार मजली अनधिकृत इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून 3 जण ठार तर 9 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेप्रकरणी इमारत मालक ताहीर रफिक अहमद अन्सारी यास शहर पोलिसांनी उशिराने ताब्यात घेवून अटक केली आहे. दरम्यान, भिवंडी महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वाढली असून या दुर्घटनेच्या निमित्ताने अनधिकृत इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

रुक्सार खान (18), अश्फाक खान (38), जैबुन्निसा रफिक अन्सारी (61) अशी मृतांची नावे आहेत. तर आशीफ याकुब खान (19), आयुब खान (58), शकील अलादिया अन्सारी (37), सलमा अन्सारी (35), रोहन खान (7), ख्वाजा मोहमंद सैयद (55), आबिद खान (21), शाबीरा याकूब पठाण (45), इमराना खान (22) जखमी आहेत.

परवीन अश्फाक खान (35) ढिगार्‍याखाली बेपत्ता आहेत. या जखमींना ढिगार्‍याखालून काढत त्यांना उपचारासाठी प्रथम शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात      आले आहे. शहरातील नवीबस्ती भाजीमार्केट भागातील ही तळ अधिक तीन मजली अनधिकृत इमारत सुमारे सात वर्षांपूर्वी ताहीर रफिक अहमद अन्सारी यांनी बांधली होती. परंतु महापालिका दप्तरी तिची नोंद झोपड्या क्रमांकानेच म्हणजेच मालमत्ता क्रमांक 511/512 अशी होती. या इमारतीमध्ये चार कुटुंबीय राहत होते. सकाळी 8 वाजताच्या सुमारास इमारतीला तडे जात ती कोसळण्याचा आवाज होत असताना काही कुटुंबीयांनी घरातून पलायन केले. परंतु तोपर्यंत ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्या ढीगर्‍याखाली 12 नागरिक अडकून पडले. तर ही इमारत समोरील घरावर कोसळल्याने त्या घरातील रुक्सर याकूब खान ही 19 वर्षीय तरुणी ठार झाली. तिचे वडील याकूब खान जखमी झाले. 

स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी नऊ जणांना बाहेर काढले. त्यांना तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ठाणे, मुंबई अग्निशामक दलासोबतच एनडीआरएफचे पथक आल्यावर येथील मदतकार्य वेगात सुरू झाले. या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता ही मुख्य अडचण असल्याने तेथपर्यंत जेसीबी आदी यंत्रसामुग्री पोहचण्यास वेळ लागला. घंटागाडीतून घटनास्थळावरील ढिगारा इतरत्र हलविण्याची वेळ आली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर जावेद दळवी, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, आ. रूपेश म्हात्रे, उपमहापौर मनोज काटेकर, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे तसेच पालिका अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून जखमींची विचारपूस केली. धोकादायक इमारतींचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. वर्षभरापूर्वीही असेच आश्‍वासन मिळाले होते.  मात्र भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्‍न आजही जैसे थे आहे. या क्लस्टर योजनेला नेमका कधी मुहूर्त मिळणार आणि आणखी किती बळी गेल्यानंतर या योजनेचा शुभारंभ होईल? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.