Tue, Mar 26, 2019 20:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा-कोरेगाव दंगल; अहवाल महिनाभरात

भीमा-कोरेगाव दंगल; अहवाल महिनाभरात

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 06 2018 1:18AMकल्याण/डोंबिवलीः वार्ताहर

1 जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीचा अहवाल महिनाभरात सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थूल यांनी सोमवारी कल्याण येथे दिली.

भीमा-कोरेगावमधील दंगलीचे पडसाद राज्यभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ 3 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलानाला हिंसक वळण लागले. बंद दरम्यान सवर्ण व दलितांवर पोलिसांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने अनुसूचित जाती-जमाती आयोगाला या प्रकरणाची चौकशी करत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्यांनी कल्याण येथील घटनास्थळांना भेट दिली. यावेळी कोणताही पक्षपातीपणा न करता कोणावरही अन्याय होणार नाही, असा समग्र अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे  सी. एल. थूल यांनी सांगितले

महाराष्ट्र बंदला राज्यभरात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. याचे पडसाद कल्याण, वढू, कोरेगाव-भीमा, औरंगाबाद, नाशिक आणि नगर येथे जास्त प्रमाणात उमटले. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, मारहाण, दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये शकडो जखमी झाले. याप्रकरणी सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तींची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या आंदोलनानंतर पोलिसांनी शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. मात्र या दरम्यान सवर्ण व पोलिसांनी आमच्यावर अन्याय केल्या, अशा तक्रारी दलितांनी मुख्यमंत्र्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती आयोगाला घटनास्थळी भेट देऊन चौकशी करत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल व एम. बी. गायकवाड यांनी कल्याण पूर्वेकडील सिद्धार्थ नगर, चिंचपाडा या घटनास्थळांंची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.