Wed, Apr 24, 2019 12:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कडकडीत बंदला मुंबईत, ठाण्यामध्ये हिंसक वळण! 

कडकडीत बंदला मुंबईत, ठाण्यामध्ये हिंसक वळण! 

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:44AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेने मुंबईमध्ये हिंसक वळण घेतले. मंगळवारच्या हिंसक आंदोलनांनी बुधवारीही शहरात विविध ठिकाणी उग्र रुप घेतल्यानंतर अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. तरीही अत्यंत शांततेने आणि संयमाने हे आंदोलन हाताळणार्‍या मुंबई पोलिसांनाच याचा सर्वाधिक फटका बसला. ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 
प्रतिमेचे दहन, टायर जाळणे, दगडफेड यासह 10 वाहनांची नासधूस आंदोलकांनी केली. कळवा परिसरातील खारीगाव पाखाडी परिसरातील पारसिक बँकेजवळील मिठाईच्या दुकानाच्या काचा फोडल्या, दुकानदारालाही मारहाण केली. यामुळे चिडलेल्या काही तरुणांनी आंदोलकांच्या 2 दुचाकी जाळल्या.

हिंसक आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या सुमारे 150 जणांना ताब्यात घेण्यात आले असून शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त सचीन पाटील यांनी दिली.मुंबईतील उच्चभू्र वसाहत असलेल्या पवईतील हिरानंदानी आणि आयआयटी परिसरात दुपारनंतर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी परिसरातील सुमारे 35 ते 40 गाड्यांची तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत तुफान दगडफेक केली. यात पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्यासह चार ते पाच अंमलदार गंभीर जखमी झाले. त्यानंतर या जमावाने दोन पोलीस गाड्यांची तोडफोड केली, तर पोलीस गाड्या जाळल्या. 

चेंबूरच्या खारदेवनगरात दोन गटांमध्ये तुफान संघर्ष झाल्यानंतर दगडफेक करण्यात आली. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेली गोवंडी पोलीस ठाण्याची एक नंबर मोबाईल गाडी फोडण्यात आली. दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरूच राहिल्याने अखेर याठिकाणी पोलिसांची अधिक कुमक वाढवत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमावाच्या दगडफेकीत दोन महिला पोलिसांसह चौदा पोलीस जखमी झाले. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे, घाडगे, अहिरे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, हवालदार चंद्रकांत निकम, मल्हारी मलमे, सोमनाथसिंग राजपूत, राजेंद्र पाटील, पूनम जेधे, सागर जगताप, धोंडीराम सरगर, किशोर भांबरे, अजित तडवी, जीवन मोहिते आदींचा समावेश आहे. 

कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात पोहचलेल्या आंदोलनकर्त्यांच्या मोठ्या जमावाने येथील गाड्यांची तोडफोड करत, रेल्वेस्थानकाच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. रेल्वेस्थानकातील बसण्यासाठी असलेले बाकडे उचकटून ते रेल्वे रुळांवर फेकले. ट्युबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. तर स्थानक परिसरातील जाहिरातीचे फलकही फाडले. तसेच जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड पुलावरुन रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती.

विक्रोळी आणि घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगर, कामराजननगर परिसातील जनसमुदायाने पुन्हा एकदा पुर्व द्रुतगती मार्गावर तीव्र आंदोलन, दगडफेक करत वाहतूक बंद पाडली. तर पश्‍चिमेकडील आरसिटी मॉलजवळ मोठ्याप्रमाणात गोळा झालेल्या जमावाने येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली. यात एका वृत्तवाहीनीची गाडीसुद्धा या जमावाच्या भक्ष्यस्थानी सापडली. याच मार्गावर काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्याने पोलिसांनी येथील बंदोबस्तात वाढ केली आहे.पूर्व उपनगरातील मुलूंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, वडाळा आणि सायन परिसरातील दुकाने मंगळवारी जबरदस्तीने बंद पाडण्यात आल्याने बुधवारी सकाळपासूनच या भागांत तणावाचे वातावरण पसरले होते. या परिसरात तुफान दगडफे करत बेस्टच्या बसेस, खाजगी आणि सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली. वाहतूक कोंडी सोडवत पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यासोबतच आंदोलनकर्त्यांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांची आजही चांगलीच दमछाक झाली. आंदोलनकर्त्यांना हटविताना पोलीस अधिकारी आणि अंमलदार गंभीर जखमी झाले आहेत. 

धारावी : भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात बुधवारी धारावी-माटुंगा परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. रिपाइं सचिव सिद्धार्थ कासारे, समाजसेवक संजय भालेराव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या महारॅलीत हजारो भीमसैनिकांनी सहभाग घेतला होता. माटुंगा लेबर कॅम्पातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीस सुरुवात झाली. यात महिला, पुरुषांसह आबालवृद्धांनी सहभाग घेतला.पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रॅलीत सामील झालेल्या सर्वपक्षीय बहुभाषिक भीमसैनिकांनी आपल्या प्रांतीय भाषेत घोषणा देत ढोल वाजवून पादचार्‍यांचे लक्ष वेधले. 

रॅली माटुंगा लेबरहून धारावी नव्वद फूट मार्गे निघाल्याने सायनहून धारावीत येणारा दुपदरी मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आला. माहीम जास्मील रोड वरून माटुंगा लेबर कॅम्पात रॅलीची सांगता बुद्धवंदना करून करण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या रॅलीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. केंद्रीय सत्तेमध्ये सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या पदाधिकार्‍यांनी आजच्या बंदमध्ये आपले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा दावा केला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे व राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करुन हा बंद यशस्वी केल्याचा दावा केला.