Sat, Jul 20, 2019 11:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिडे यांना मुख्यमंत्र्यांची क्‍लीन चीट

भिडे यांना मुख्यमंत्र्यांची क्‍लीन चीट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट दिली आहे. भिडेंविरोधात चौकशीत कोणताही पुरावा सापडलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कायदा व सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेत एकाच गुह्यात मिलिंद एकबोटे यांना अटक केली असताना, त्याच गुह्यात संभाजी भिडे यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विधानसभेत उत्तर दिले. ते म्हणाले, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांचा सहभाग आहे का? याबाबतचा तपास करण्यात आला. त्यांचे व त्यांच्या प्रमुख सहकारी यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यांचे लोकेशन तपासले गेले. मात्र, त्यांचा कोणताही सहभाग असल्याचे आतापर्यंत आढळून आले नाही. ही माहिती आपण प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एका महिलेने संभाजी भिडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. ती तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. तसेच त्याचा तपासही करण्यात आला. 1 जानेवारीच्या आधी किंवा त्या दिवशीही संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव येथील स्थानिक जनतेशी संबंध नसल्याचे आढळून आले. तेथील कोणाला ते ओळखत नसल्याचेही केलेल्या तपासात उघडकीस आले. त्यामुळे त्यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. मिलिंद एकबोटे यांना सरकारने कुठेही पाठीशी घातले नाही. त्यांना न्यायालयात जामीन मिळू नये म्हणून सरकारने सुप्रीम कोर्टापर्यंत ठामपणे बाजू मांडली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सोमवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चाही काढण्यात आला होता. तसेच या मोर्चाचे शिष्टमंडळ आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भेटायला आले होते. त्यावेळीही त्यांना ही बाब सांगितली आहे. त्यावेळी अ‍ॅड. आंबेडकर यांनी, भिडे यांच्याविरोधात आणखी नवे पुरावे सादर करणार असल्याचे सांगत, एका फेसबुक पोस्टवरील माहिती दिली. त्या अनुषंगानेही आणखी तपास करणार असल्याचे सांगत याबाबत 8 दिवसांत कारवाई पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणात कोण, कितीही मोठा असला, तरी करवाई केली जाईल. आपल्या घरातील व्यक्‍ती असली, तरी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संभाजी महाराज स्मारक आणि विजयस्तंभ परिसराचा विकास

संभाजी महाराज यांचे वडू येथील स्मारक आणि भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसराचा राज्य सरकार विकास करेल, असे सांगतानाच विजयस्तंभ परिसरातील जागेचा प्रश्‍नही लवकरच सोडवू, असे ते म्हणाले. ही सूचना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केली होती.

भीमा कोरेगाव दंगलीतील सर्व केसेस मेरिट तपासून मागे घेण्यात येतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिले. मात्र, ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे ते म्हणाले.

Tags : Bhima Koregaon Violence Case, Devendra Fadnavis, clean chit, Sambhaji Bhide, 


  •