Wed, Feb 26, 2020 02:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिडे गुरुजी, एकबोटेंवर चौकशीनंतरच कारवाई : मुख्यमंत्री

भिडे गुरुजी, एकबोटेंवर चौकशीनंतरच कारवाई : मुख्यमंत्री

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 7:36AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथे आंबेडकरी समाजावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी या दोघांच्या तत्काळ अटकेची शक्यता कमी आहे. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतरच भिडे व एकबोटे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यास दुजोरा दिला आहे.

भिडे व एकबोटे यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला असताना अद्यापही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यावर ‘पुढारी’शी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणाच्या न्यायालयीन  चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होईल. या प्रकरणाच्या शेवटापर्यंत सरकार जाणार असून दोषींना मोकळे सोडले जाणार नाही. छत्रपती शाहू , महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात झालेली ही घटना दुर्दैवी आहे. राज्याबाहेरच्या काही व्यक्ती राजकीय लाभ घेण्यासाठी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र राज्यातील जनता त्यांचे मनसुबे उधळून लावील. सरकारने विकासाला प्राधान्य दिले आहे. सध्या विरोधकांकडे काहीही मुद्दे नसल्यामुळे ते नाहक वाद निर्माण करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.