Mon, Jun 24, 2019 17:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भातसा नदीपात्रात अनुभवता येणार जलक्रीडा

भातसा नदीपात्रात अनुभवता येणार जलक्रीडा

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 12:58AM

बुकमार्क करा

ठाणे : राहुल क्षीरसागर

ठाणे, मुंबईतील पर्यटनप्रेमींना निसर्गाच्या सान्निध्यासह जलक्रीडा अनुभवण्यासाठी अलिबाग वा गोवा ही पर्यटन स्थळे गाठावी लागतात. जलक्रीडेची ही संधी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात उपलब्ध करण्यात आली आहे. भातसा नदीच्या पात्रात जलक्रीडांचा थरार अनुभवताना भागदळ गावातील वाफा या पर्यटन केंद्राचा अनुभव घेता येतो. एवढेच नाही तर बांबूच्या झोपड्यांसह जेवणासह सर्व सुविधांयुक्त जंगलातील घरांमध्ये राहण्याचा अनुभव उपभोगता येतो. 

धरणांचा जिल्हा म्हणून ठाण्याची ओळख आहे. जोडीला आदिवासी ओळख कायम आहे. शहापूर, मुरबाड सारख्या ग्रामीण जीवनशैली असलेले तालुके आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या ग्रामीण भागात अनेक किल्ले, नदी, मंदिरे, पौराणिक वास्तू आहेत. त्यापैकी शहापूर हा आदिवासी तालुका होय. या तालुक्यात माहुली किल्ला, मानस मंदिर,  धरणे, धार्मिक, पर्यटन स्थळे ही आकर्षणाची केंद्रे आहेत.  असे असले तरी रोजगाराच्या मुलबक संधी उपलब्ध नसल्याने अनेक तरूण हे शहरांकडे धाव घेत आहेत. 

निसर्ग रम्य परिसर, वन संपदा असतानाही शहापूर तालुक्यातून स्थलांतर होणे, कुपोषणाचे डाग लागणे हे नित्याचे बनले आहे. त्यावर उपाय म्हणून ठाणे वन विभागाने शहापूरसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये इको टुरीझम विकसित करण्यास सुरूवात केली आहे. आजोबाचा डोंगर, बोर्डी आणि वाफा या पर्यटन केंद्रांचा विकास करण्यात आला असून माळशेज घाटाचाही विकास होऊ घातला आहे. 

पर्यटन केंद्रापैकी वाफा हे पर्यटन केंद्र शहापूर तालुक्यात असून ते निसर्गाने चोहोबाजूने नटलेले आहे. भातसा नदीच्या काठावरील या केंद्राला जलक्रीडांच्या थराराची जोड देऊन वन विभागाने पर्यटकांना गेल्या दहा वर्षापासून आकर्षित केले आहे. निसर्गाचा सहवास घेताना नदीत जेटस्की इंजिन बोट, सिंगल आणि डबल बनाना राईडस,  मेरीगोल्ड सोफा राईडची मजा लुटता येते. शहापूरपासून अवघ्या दीड किलो मीटर अंतरावर भातसा नदीच्या किनारी हे निसर्ग पर्यटन स्थळ पर्यटकांना सतत खुणावत असते. 

वाफा पर्यटन केंद्रामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळत असताना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. 10 ते 12 स्थानिकांना कायमस्वरुपी नोकरी लागली असून त्यांच्या माध्यमातून अन्य तरूणांना नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याचे संदेश दिले जात आहे. केंद्रांवरील पर्यटकांची वाढती गर्दी पाहून इतर ग्रामस्थांनाही मदतीसाठी बोलावले जाते. त्यांना योग्य तो मोबदलाही दिला जातो.