होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्‍लॉग : आंब्याच्या रसात अवघ्यांची अक्‍कल वांझ!

ब्‍लॉग : आंब्याच्या रसात अवघ्यांची अक्‍कल वांझ!

Published On: Jun 12 2018 9:52AM | Last Updated: Jun 12 2018 11:30AMदत्तकुमार खंडागळे, सांगली

            
दुनिया झुकती है | उसे झुकानेवाला चाहीये || असे कोणीतरी म्हटलंय. याचा प्रत्यय समाजात वारंवार येत असतो. राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो की, माझा गणपती दूध पिला ! लगेच राज्याच्या काना-कोपर्‍यातले गणपती दूध प्यायला सुरुवात करतात. रांगा लावून लोक गणपतीला दूध पाजायला बाहेर पडतात. अनेक उठवळ भक्तांच्या झुंडी माझाही गणपती दूध पिल्याचे छाती ठोकून सांगतात. हे २१ व्या शतकात फक्त भारतातच घडू शकतं. या वरून इथला समाज किती प्रगल्भ आहे? तो किती जागरूक व डोळस आहे ? याची खात्री पटते. १९९५ ला राज्यात सेना-भाजपाचे युती सरकार सत्तेत होते. तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी जाता जाता अवघ्या राज्याला शेंडी लावून मुर्खात काढले होते. समाजाचा बौध्दीक स्तर न उंचावल्यानं हे घडते. असलाच समाज तुकोबा सदेह वैकुंठाला गेल्याच्या थापा स्वीकारतो.

आजही समाजात फार वेगळी अवस्था असल्याचे दिसत नाही. गणपतीच्या दुधाची आठवण यायचे कारण म्हणजे, सध्या राज्यभरात संभाजी भिडेंच्या आंब्याची व त्याने होणार्‍या पोरांची चर्चा जोरात आहे. आंब्याचा विषय फार महत्वाचा नाहीच पण आंब्याच्या निमित्ताने समाज मुर्खात कसा काढला जातो ? हा विषय जास्त महत्त्‍वाचा वाटतो आहे. सध्याची सामाजिक स्थिती पाहिल्यावर समाज बाल्यावस्थेतच असल्याचे दिसून येते. शेवटी, "समुह बिनडोकच असतो" असे म्हणतात. पण याच समाजातली माध्यमं, विचारवंत वगैरे मंडळीही अशी फुटकळांसारखी व बेजबाबदार वागू लागली तर काळजात धस्स झाल्याशिवाय राहात नाही. आंब्याच्या विषयावर अनेक विद्वानांच्या अकलेचे पतन जोरात सुरू आहे. माझे तासगांवचे एक हरिदास (तात्या) पवार नावाचे मित्र आहेत. साधारण आठ-दहा वर्षापूर्वी त्यांच्या घरी आम्ही बोलत बसलो असता, त्यांनी मला  गारीगारवाल्याची गोष्ट सांगितली होती. शाळेत उद्या डॉक्टर येणार म्हणून सांगितले तर मुलं शाळेलाच येत नाहीत. पण तसे न सांगता, उद्या शाळेत गारीगारवाला येणार आहे म्हणून सांगितलं तर मुलं गर्दी करतात. अशा आशयाची ती गोष्ट होती. त्यावेळी हरिदास तात्या म्हणाले होते की, दत्तकुमार समाज नेहमी गारीगारवाल्यालाच भुलतो. ज्याने आरोग्य बिघडणार आहे त्याच्याच मागे धावतो. कारण समाजाची वैचारिक पात्रताच तेवढी आहे. आज भिडेंच्या आंब्याच्या निमित्ताने मला हरिदास तात्यांच्या गारीगारवाल्याची आवर्जून आठवण झाली. कारण लोकांची मानसिकता त्याच स्थितीला असल्याचे दिसते आहे.

सध्या समाजात माध्यम किंवा मीडिया (इंग्रजीत) नावाचे गारीगारवाले खूपच फैलावले आहेत. ते लोकांना पाहिजे तसे मूर्ख ठरवतात. बिच्चारे लोकही सहजपणे मूर्ख होतात. संभाजी भिडेंची दोन दिवसातली दोन वक्तव्ये प्रसिध्दी माध्यमात आली. आदल्या दिवशी आले की, "लवकरच तलवारी हाती घेण्याची वेळ येणार आहे !" तर दुसर्‍या दिवशीचे वक्तव्य आले की माझ्याकडे आंब्याचे झाड आहे त्याचे आंबे खाल्ले की पोरं होतात. पहिले अहमदनगर येथील वक्तव्य व दुसरे नाशिक येथील वक्तव्य. ते रायगडावर बत्तीस मण सोन्याचे सिंहासन बसवण्याच्या तयारीत आहेत. त्या सिंहासनासाठी निधी संकलन व सिंहासनाच्या रक्षणासाठी २००० युवकांची खडी फौज उभारण्याच्या तयारीसाठी सर्वत्र फिरून व्याख्याने देत आहेत. त्यांच्या पहिल्या वक्तव्यावर (तलवारी बाबतच्या) फारशी चर्चा झाली नाही. ते चर्चेत येणार तोच भिडेंच्या आंब्याच्या रसात अवघा महाराष्ट्र वाहून गेला. 

मुख्य प्रवाहातली मोठी-मोठी माध्यमं, सोशलं माध्यमं सर्वत्र तेच सुरू होते. काही माध्यमांनी तर यावर खास (स्पेशल) चर्चा ठेवल्या. या चर्चेत मान्यवर विचारवंत बुडाला काकडा लागेपर्यंत वादविवाद करत होते. हे सगळं चित्र पाहताना लोकांच्या उथळपणाची किव आली अन माध्यमांच्या चलाखीची लाज वाटली. हे सर्व पाहताना तासगावच्या हरिदास तात्यांनी सांगितलेली गारीगारवाल्याची गोष्ट माझ्या कानात परत परत घुमत होती. गारीगारवाल्यांची ही आधुनिक रूपं डोळ्यासमोर उभी होती. त्यांच्यामागे भरकटणारा समाज डोळ्यासमोर येत होता. सोबत गारीगारवाल्याच्या सायकलला बांधलेल्या डबड्याचा जसा आवाज येतो तसाच पण एक गंभीर आवाज कानठळ्या बसेपर्यंत ऐकू येत होता. तो आवाज जणू लोकशाहीने फोडलेला हंबरडा असावा असे वाटत होते. खरंच समाज गारीगारवाल्याच्याच मागे पळतो याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय आला.

खरेतर संभाजी भिडेंच्या दोन दिवसातल्या दोन वक्तव्यांपैकी आदल्या दिवशीचे म्हणजे अहमदनगरचे वक्तव्य भयानक होते. "धारकर्‍यांच्यावर लवकरच तलवार घ्यायची वेळ येईल !" असे ते म्हणाले होते. खरेतर यावर माध्यमांनी चर्चा घ्यायला पाहिजे होत्या. लवकरच या महाराष्ट्रात असे काय घडणार आहे ? असा कोणता धोका येणार आहे ? की ज्यामुळे धारकर्‍यांना काठ्या सोडून हातात तलवारी घ्याव्या लागतील. ते ही देशात पोलिस, लष्कर वगैरे वगैरे सुरक्षा यंत्रणा असताना. पण या तलवारी नक्की कुणाविरूध्द घेतल्या जाणार आहेत ? देशातल्या देशात त्या तलवारी कुणाविरूध्द उपसल्या जाणार आहेत ? याचा उलगडा होण्याची गरज आहे. पण चालाख माध्यमांनी तलवारीचे वक्तव्य म्यान करण्यासाठी अवघ्या राज्याच्या डोळ्यात आंब्याचा रस पिळला. आजवर डोळ्यात माती टाकतात हे माहीत होते. पण डोळ्यात आंबाही पिळता येतो याचा प्रत्यय या निमित्ताने आला. 

आंब्याने मुलं होतील न होतील हा नंतरचा भाग पण आंबे डोळ्यात व मस्तकात पिळून मूर्ख करता येते हे तरी समजले. भिडेंचे मागचे पुढचे वक्तव्य न दाखवता थेट पोरं कशी होतात व नपुंसकत्व कसे जाते ? याची हमी देणारे वाक्य दाखवले गेले. या वक्तव्यावर न बोलेल तो आळशी. चढाओढीने महाराष्ट्र व्यक्त झाला. अवघ्यांच्या अकलेचे शिघ्रपतन होताना पाहिले. खरोखर लोक मनूरूग्ण होताना दिसत आहेत. आदल्या दिवशीचे त्यांचे वक्तव्य इतके गंभीर असताना लोकांना त्याचे काहीच वाटू नये याचे आश्चर्य वाटते. पुरूषत्व, नपुंसकत्व आणि आंब्याने होणारी पोरं यात प्रत्येकाच्या अकलेचा गर्भपात होताना दिसला. तसेच मीडिया नावाचे गारीगारवाले लोकांना कसा गंडा घालतात ? लोकांना कसे उल्लू बनवतात ? याचाही छान प्रत्यय आला. लोकांची रूची, अभिरूचीच जर अशी असेल, या लायकीची असेल तर असेच होणार ! त्यात भिडेंचा आणि माध्यमांचा तर काय दोष ? दुनिया झुकती है तो झुकानेवाले झुकायेंगे | बार बार झुकायेंगे |

युवकांच्या हातात वह्या-पुस्तके, लॅपटॉप किंवा उद्योगाच्या, व्यवसायाच्या गुरूकिल्ल्या देण्याची गरज आहे. अवघ्या विश्वाचा, ब्रम्हांडाचा वेध घेणार्‍या सुसज्ज प्रयोगशाळा संशोधनासाठी युवकांच्या हातात देण्याची गरज असताना भिडे तलवारी देण्याची भाषा करतात. "लोकशाही बुडाली असे लोक बोंबलतील" म्हणून ते तलवारी न देता तुर्त काठ्याच देताहेत. पण लवकरच तलवारी देण्याची वेळ येणार असल्याचेही भाकीत ते करतात याचा अर्थ काय ? नक्की असं कोणतं महाभयंकर संकट येणार आहे की ज्यामुळे धारकर्‍यांना तलवारी घ्याव्या लागणार आहेत ?  पोलिस, लष्कर या सर्व यंत्रणा असतानाही धारकरी तलवारी घेवून का सज्ज केले जाणार आहेत ? कुठल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज केले जाणार आहेत ? या संकटाबाबत त्यांनी समाजाला व  सरकारला माहिती द्यायला हवी. पण ती न देताच ते स्वत:च सैन्य बांधणीत गुंतले आहेत.  लोकशाहीत असे खासगी सैन्य बांधण्याचा अधिकार कुणाला आहे काय ? देशात सगळी सुरक्षा  यंत्रणा असताना स्वत:ची सशस्त्र फौज का व कशासाठी बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत ? जगात चौथ्या क्रमांकाची लष्करी ताकद भारताकडे आहे. रात्रं-दिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर देशाचे रक्षण करणार्‍या लष्करावर आणि चोविस तास समाजाच्या सुरक्षेसाठी राबणार्‍या पोलिसांच्यावर भिडेंचा विश्वास नाही काय ? 

रायगडावर जर बत्तीस मण सोन्याचे सिंहासन बसवलेच तर त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची नाही काय ? की इथले सरकार त्या लायकीचे नाही ? सध्या देशात भिडेंच्या आवडत्या मोदींचे व फडणविसांचेच सरकार आहे. या सरकारवरही त्यांचा विश्वास नाही काय ? ते तर मोदींना ईश्वरी अवतार म्हणाले होते. देशात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वरी अवताराची सत्ता असताना भिडेंना समांतर सुरक्षा यंत्रणा उभी करण्याची घाई का झाली आहे ? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. तरीही लोकांना "आंबे आणि पोरं" या फुटकळ चर्चेत अडकवून ठेवले गेले. परिणामी तलवारीच्या वक्तव्याची आठवणही कुणाला होवू नये. यासाठीच माध्यमांनी आंब्याच्या वक्तव्याला प्रसिध्दी दिली की काय ? अशी शंका येते.  माध्यमांनी एक अतिशय गंभीर विषय सहज संपवून टाकला आहे. सोशल माध्यमात आंब्याच्या वक्तव्याची टर व टिंगलही उडवली गेली. पण टिंगल-टवाळीत अतिशय महत्वाचा विषय शिताफीने दुर्लक्षित करण्यात आला. हा गेम प्लॅन नक्की कुणाचा आहे ? माध्यमांचा की खुद्द फडणविसांचा?