Sat, Nov 17, 2018 18:32



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाग्यश्री ऑनलाईन लॉटरीचा मास्टरमाईंड गजाआड!

भाग्यश्री ऑनलाईन लॉटरीचा मास्टरमाईंड गजाआड!

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:13AM



मुंबई : वार्ताहर

राजश्री लॉटरीची शाखा चालवताना एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने तशीच हुबेहूब भाग्यश्री ऑनलाइन लॉटरी सुरू केली. याद्वारे फसवणूक करत मोबाइलद्वारे सट्टा सुरू करणार्‍या मास्टरमाइंड कादर बादशहा अल्लाबक्ष शेख (42) याच्यासह अल्पेश जमनादास भाटिया (34), जहिरुद्दीन शेख (45) आणि नरेंद्र पुरुषोत्तम कनानी (52) या चौकडीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. अनधिकृत लॉटरी चालकांमुळे शासनाच्या करोडो रुपयांच्या जीएसटीचे नुकसान झाले आहे.

मूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेल्या बादशहाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून मुंबई गाठली. सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. यात तो मास्टर बनला. मुंबईतील राजश्री लॉटरीची शाखा चालवण्याचे काम त्याला मिळाले. अशातच जीएसटीमुळे लॉटरी व्यवसायात मिळणारे कमिशन कमी झाले. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने राजश्री लॉटरीसारखीच हुबेहूब ‘भाग्यश्री ऑनलाइन लॉटरी’ची वेबसाइट तयार केली. त्याने या वेबसाइटचे सर्व्हर कॅनडामधून नोंदणी करून घेतले. चारकोपमधील एका पतपेढीच्या पोटमाळ्यावर त्याने बनावट लॉटरीच्या साइटवरून फसवणुकीचा धंदा सुरू केला.

त्यानुसार, गुन्हे प्रकटीकरण कक्ष 1 चे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 11 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकाने मालवणीच्या स्कॉटर्स कॉलनी येथील राजश्री लॉटरी सेंटरवर छापा टाकला. तेथील तपासात बादशहाचा पर्दाफाश झाला. त्यापाठोपाठ कांदिवली येथील कार्यालयातही छापे टाकण्यात आले. यामध्ये बादशहासह चौघांना अटक करण्यात आली. दिवसाला 20 ते 30 हजारांची कमाई  गेल्या सहा महिन्यांपासून बादशहा या धंद्यातून करत होता, अशी माहिती समोर आली आहे.  आरोपींकडून 6 संगणक, 8 मोबाइल, 2 ईडीसी मशीन, 1 प्रिंटर, 1 स्कॅनर, 1 राऊटर, चिठ्ठी व लॉटरी प्रिंट करण्याच्या साहित्यासह 3 लाख 28 हजार 280 रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.