Fri, Aug 23, 2019 14:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांच्या नावे  चिठ्ठी लिहून भगूरच्या शेतकर्‍याची आत्महत्या

मुख्यमंत्र्यांच्या नावे  चिठ्ठी लिहून भगूरच्या शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Dec 19 2017 2:03AM | Last Updated: Dec 19 2017 1:17AM

बुकमार्क करा

भगूर : वार्ताहर

कर्जबाजारीपणाला कंटाळून भगूर येथील शेतकर्‍याने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.18) सकाळी घडली. जगदीश बहिरू शिरसाट (37) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव असून, त्यांच्या खिशात मुख्यमंत्र्यांच्या नावे कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी आढळून आली.

मयत जगदीश यांचे एकत्र कुटुंब आहे. त्यांनी शेतीसाठी भावाच्या नावावर 95 हजार, पत्नीच्या नावे 30 हजार, तर इतर 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांच्या स्वतःच्या नावावर कर्ज नसले तरी कुटुंबप्रमुख या नात्याने कर्ज फेडण्याची जबाबदारी जगदीश यांच्यावर होती. कर्जमाफीनंतर रेग्युलर कर्जफेडीला त्यांना 18 हजार 492 रुपये शासकीय अनुदान आले होते. अनुदानाची रक्‍कम घेण्यासाठी येथील जिल्हा बँक शाखेत गेले असता त्यांना दर हप्‍ता फक्‍त एक हजार रुपये देण्यात येतील, असे सांगण्यात आले. संपूर्ण रक्‍कम मिळण्यासाठी 18 हप्‍ते लागणार असल्याने आलेल्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

याप्रकरणी देवळाली रेल्वेच्या पोलिसांनी पंचनामा केला असता मयताच्या खिशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. सरकारने प्रोत्साहन कर्ज दिले. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणी आल्याने त्रस्त होऊन आत्महत्या करत असून, पत्नीला शासनाकडून न्याय मिळावा, असा चिठ्ठीचा आशय आहे.