होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्ट संप अटळ; उद्या निर्णय

बेस्ट संप अटळ; उद्या निर्णय

Published On: Aug 25 2019 1:43AM | Last Updated: Aug 25 2019 1:36AM
मुंबई : प्रतिनिधी 

बेस्ट उपक्रमाच्या 98 टक्के कर्मचार्‍यांनी संपाच्या बाजूने, तर अवघ्या 2 टक्के कर्मचार्‍यांनी संप करू नये असा कौल दिला आहे. त्यामुळे बेस्टचा संप कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी प्रशासनाला अजून काही अवधी देण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतर संप करायचा की नाही, याबाबतची घोषणा होईल. तसे झाल्यास ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांना मोठा फटका बसू शकतो.

कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी संप करायचा की नाही, यासाठी बेस्ट कृती समितीच्या माध्यमातून बेस्ट कर्मचार्‍यांचे शुक्रवारी गुप्त मतदान घेण्यात आले होते. आगारा-आगारांत झालेल्या या मतदानात 17 हजार 925 कर्मचार्‍यांनी भाग घेतला. शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने दहशत माजवून कर्मचार्‍यांच्या मतदानाच्या हक्काला आणि लोकशाही प्रक्रियेला बाधा आणली होती. परंतु त्याला न जुमानता कर्मचार्‍यांनी मतदान केले. यात बसचालक व वाहकांची मोठी संख्या आहे. त्यापैकी 17 हजार 497 कर्मचार्‍यांनी संप करावा, तर 368 कर्मचार्‍यांनी संप करू नये, असे मत नोंदवले आहे. ऑनलाईनद्वारे 1 हजार 731 कर्मचार्‍यांनी मतदान केले. यापैकी 1 हजार 586 कर्मचार्‍यांनी संप करावा, तर 97 कर्मचार्‍यांनी संप करू नये, असे मत नोंदवले आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचारी कधीही संपावर जातील.  

हा संप होऊ नये असे वाटत असेल तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त, बेस्ट प्रशासन, बेस्ट समिती यांनी कर्मचार्‍यांच्या वेतन सुधारणा प्रश्नी तातडीने मार्ग काढावा, बेस्ट अर्थसंकल्प पालिकेत विलीनीकरण करण्यासाठी केलेल्या ठरावची तातडीने अंमलबजावणी करा, बेस्ट कर्मचार्‍यांबाबत सापत्न भाव न ठेवता महापालिका कर्मचार्‍यांप्रमाणे त्यांनाही दिवाळीला सानुग्रह अनुदान द्या, अशी मागणी कामगार नेते शशांक राव यांनी केली आहे. अन्यथा मुंबईकरांची माफी मागून आम्ही संपावर जाऊ, असे राव यांनी सांगितले.