Sun, Jul 21, 2019 17:06
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्टचा संप मागे, खासगी बस प्रवेशाला कोर्टाची स्थगिती 

बेस्टचा संप मागे, खासगी बस प्रवेशाला कोर्टाची स्थगिती 

Published On: Feb 14 2018 8:54PM | Last Updated: Feb 14 2018 8:54PMमुंबई : प्रतिनिधी 

बेस्टने खाजगी बस ताफ्यात सामिल करून घेण्याच्या करारावर सह्या करू नये, असा आदेश औद्योगिक कोर्टाने बुधवारी दिला. याबाबत कोर्टाने 5 मार्चला सुनावणी ठेवली असल्यामुळे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 14 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुकारलेला संप मागे घेतल्याची घोषणा केली. कमकूवत आर्थिक परिस्थितीमुळे नव्या बस खरेदी करणे बेस्ट उपक्रमाच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे आता खाजगी बस ताफ्यात सामिल करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतचा प्रस्ताव दोन दिवसापूर्वी समितीत मंजूर झाला. या निर्णयाच्या विरोधात बेस्ट कृती कामगार समितीने बुधवार 14 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने कामगार नेत्यांची समजूत काढण्यासाठी बुधवारी मॅरेथॉन चर्चा केली. पण या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे रात्री उशीरा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मध्यस्थी करून संयुक्त कृती समितीचे नेत्यांशी चर्चा केली. पण खाजगी बस सामिल करून घेण्याचा निर्णय मागे घेईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट मत यावेळी व्यक्त केले. दरम्यानच्या काळात बेस्ट कृती समितीने पुकारलेल्या संपाच्या विरोधात औद्योगिक कोर्टात धाव घेतली. यावेळी कोर्टाने पुढील सुनावणी होईपर्यंत खाजगी बस ताफ्यात सामिल करून घेण्याचा करार करू नये, तर कामगार संघटनांनीही सुनावणीपर्यंत संप पुकारू नये, संपात सहभागी होणार्‍या युनियनला नोटीस बजावण्यात यावी व युनियनने आपले लेखी म्हणणे सादर करावे, असे आदेश कोर्टाने दिले. त्यामुळे बेस्ट संयुक्त कृती समितीने 5 मार्चपर्यंत संप पुढे ढकलला आहे. खाजगी बस सामिल करून घेण्याचा निर्णय घेऊ नये, असे आपण प्रशासनाला समितीच्या बैठकीच्यावेळी बजावले होते. पण प्रशासनाने ते ऐकले नाही. अखेर कोर्टाने या निर्णयावर स्थगिती आणून प्रशासनालाच नाही तर सत्ताधारी शिवसेनेला उघडे पाडले आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा आदर राखून संप सुनावणीपर्यंत पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कामगार नेते सुनिल गणाचार्य यांनी सांगितले.