होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्ट संपाचा चेंडू शासकीय समितीकडे

बेस्ट संपाचा चेंडू शासकीय समितीकडे

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:24AM
मुंबई : प्रतिनिधी 

बेमुदत संप पुकारून चार दिवस उलटले तरी महापालिका आणि शासन स्तरावर कोणताही तोडगा न निघाल्याने कामगार नेते शशांक राव यांनी शुक्रवारी सायंकाळी परळ शिरोडकर हॉल येथे झालेल्या कामगार मेळाव्यात बेस्टचा संप सुरूच राहणार असल्याची घोषणा केली. परिणामी शनिवारी पाचव्या दिवशीही मुंबईकरांचे हाल होणार आहेत. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचार्‍यांच्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती शनिवारी बैठक घेऊन कामगार संघटना आणि प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

गेले तीन दिवस कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासन तसेच मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेत चर्चेच्या फेर्‍या होऊनही तोडगा निघालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मध्यस्थी करीत संपाची कोंडी फोडण्याचे केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले. आता या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. बेस्ट संपाच्या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता महाधिवक्ता अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारच्यावतीने तीन सदस्यांची समिती नेमल्याची माहिती दिली. 

या समितीत मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांचा समावेश आहे. ही समिती बेस्ट कामगार संघटना, बेस्ट प्रशासन तसेच मुंबई महापालिकेशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सरकारने नेमलेली समिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आणि मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. संपावर आपली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केले.

कामगार संपावर ठाम

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या वाटाघाटींमध्ये बोनससह अनुकंपा तत्वावर भरती व वसाहतीच्या दुरूस्तीबाबत सकारात्मक चर्चा झाली. पण अर्थसंकल्प विलिनीकरण व 2007 मध्ये भरती झालेल्या कर्मचार्‍यांना पुर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्‍चितीबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वास प्रशासनाने दिले. पण कामगार नेते लेखी आश्वसनावर ठाम राहिले. तब्बल सात ते आठ तास चर्चेनंतरही सायंकाळपर्यंत कोणताच तोडगा निघाला नाही. परिणामी शुक्रवारी शिरोडकर हॉलमधील कामगार मेळाव्यात  कामगार नेते शशांक राव यांनी मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याचे कर्मचार्‍यांना सांगितले. यावर कर्मचार्‍यांनी एकमुकाने संप सुरू ठेवण्याची मागणी केली.