Thu, Apr 25, 2019 05:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत आता बेस्ट शौचालय!

मुंबईत आता चक्क 'बेस्ट' शौचालय!

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:53AM

बुकमार्क करा
मुंबई : राजेश सावंत

पोलीस व्हॅनच्या धर्तीवर बेस्टच्या भंगारात निघणार्‍या जुन्या बसचे फिरत्या शौचालयात रूपांतर करण्याचा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे. तर, मुंबईला हागणदारीमुक्त करण्यासाठी ही योजना अमलात आणण्यासाठी पालिका प्रशासन अनुकूल असून बेस्ट प्रशासनही जुन्या बस भंगाराच्या किमतीत पालिकेला देण्यास तयार असल्याचे समजते. त्यामुळे मुंबईत होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमासह पश्‍चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर ही शौचालय उपलब्ध करून देणे शक्य होणार आहेत.

मुंबईत 2018 मध्ये बहुमजली शौचालय उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. पण यामुळे पूर्णपणे मुंबई शहर हागणदारीमुक्त होईलच याची खात्री नाही. मुंबईतील पश्‍चिम व पूर्व द्रुतगती महामार्गासह जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एस. व्ही. रोड, एल. बी. एस. मार्ग व अन्य मोठ्या रस्त्यांलगत शौचालय नसल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. विशेषत: महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा रस्त्यांवर शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पण यातील काही रस्ते राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्यामुळे शौचालय उभारण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे पालिकेने फिरत्या शौचालयांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  याबाबतचा ठरावही महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. या योजनेला पालिकेच्या घनकचरा विभागाने अनुकूलता दर्शवली आहे. जे शौचालय उभारण्यासाठी जागा उपलब्ध होणार नाही, अशा ठिकाणी फिरत्या शौचालयाचा चांगला उपयोग होऊ शकतो. बेस्टने बस उपलब्ध केल्यास फिरत्या शौचालयाचा विचार करणे शक्य असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान आयुर्मान संपलेल्या बसमध्ये शौचालय करणे शक्य आहे का ? याची विचारणा आरटीओकडे करून, भंगारात निघणार्‍या बस पालिकेला देण्यात काहीच हरकत नसल्याचे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याकडून सांगण्यात आले.