Fri, Nov 24, 2017 20:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्ट महाग : हॉटेल स्वस्त

बेस्ट महाग : हॉटेल स्वस्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

आर्थिक अनुदानासाठी पालिका आयुक्तांनी सुचवलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीत सत्ताधारी शिवसेनेने मंजुरी दिली. 6 किमीपासून 1 ते 12 रुपयेपर्यंत भाडेवाढ होणार असून,  याचा फटका तब्बल 12 ते 15 लाख प्रवाशांना बसणार आहे. बँकांकडून कर्ज घेऊन कामगारांना पगार द्यावा लागत आहे. बेस्टला बँकाही कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे नाईलाजाने भाडेवाढीसह भत्ते गोठवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही  बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले.

मासिक पासातही 6 किमीपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 6 किमी अंतराच्या मासिक पासचे भाडे 620 रुपयांवरून 660 रुपये होणार आहे. तर 20 किमी अंतराच्या मासिक पासचे भाडे 1 हजार 150 वरून थेट 1 हजार 500 रुपयांवर पोहोचणार आहे. 

5 टक्के जीएसटीनुसार दर आजपासून अंमलबजावणी 

मुंबई : प्रतिनिधी

मंगळवारी रात्री मुंबईतील असंख्य हॉटेल्स जरा लवकरच बंद झाली. कारण मंगळवारपासून हॉटेल स्वस्ताई अवतरत असून, यापूर्वीचा 18 टक्के जीएसटी 5 टक्क्यांवर आला आहे. ही कपात होऊन आठवडा लोटला तरी अंमलबजावणीची चिन्हे नव्हती. शेवटी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दणका देताच हॉटेल स्वस्ताईची दारे खुली झाली. 

जीएसटीचे नवे दर 15 नोव्हेंबरपासून देशभर लागू होत असून त्यानुसार सर्व हॉटेल चालकांना बुधवारपासून दर पत्रकात बदल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे हॉटेल मालक दर कमी करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक तसेच परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा गिरीश बापट यांनी दिला. पाठोपाठ हॉटेल्सचालकांनी दर कपातीची तयारी सुरू केली. आता हॉटेलात बुधवारपासून केवळ 5 टक्केच जीएसटी द्यावा लागणार आहे. यापूर्वी साध्या हॉटेलसाठी 12 टक्के व एअरकंडिशन्ड हॉटेलसाठी असलेली 18 टक्क्यांची तुरतूद आता केवळ 5 टक्कयांवर आणण्यात आली आहे. 

हॉटेल्सवरील 5 टक्के जीएसटीची अंमलबजावणी बुधवारपासून होत असली तरी सरकारच्या अधिसुचनेची प्रत आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याचे आहार संघटनेचे म्हणणे आहे. तरिही या निर्णयाची बुधवारपासूनच काटेकोर अमलबजावणी करण्याच्या सूचना आहार संघटनेने सर्व सदस्यांना केली आहे. बिलींग सिस्टीममध्ये त्यादृष्टीने आवश्यक ते बदल करण्यासाठी मंगळवारी रात्री अनेक हॉटेल्स लवकर बंद करण्यात आली.

जेवणावर जीएसटी लावला गेल्याने गेले चार महिने आमच्या धंद्यावर खूप परिणाम झाला होता. अनेकदा ग्राहकांसोबत खटकेही उडत होते. मात्र जीएसटी 18 टक्क्यावरुन 5 टक्क्यांपर्यंत खाली आणल्याने सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. ग्राहकांनी सोशल मिडियावर जीएसटीच्या त्या कठोर निर्णयाविरोधात टिका करुन आम्हाला एकप्रकारे मदत केली, असे आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.