Tue, Jul 23, 2019 06:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्टचे दैनंदिन भाडे २० रुपयांनी महागणार!

बेस्टचे दैनंदिन भाडे २० रुपयांनी महागणार!

Published On: Mar 06 2018 1:49AM | Last Updated: Mar 06 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी 

बेस्टने बस भाडेवाढीसह शालेय, महाविद्यालयीन, मासिक व दैनंदिन बसभाड्यातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दैनंदिन पाससाठी 20 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. 

बेस्टची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कर्मचार्‍यांना वेळेत पगार देण्यासाठी पुरेसा निधीही बेस्टकडे नाही. त्यामुळे बँकातून कर्ज काढून पगार देणे भाग पडत आहे. बेस्टने पालिकेकडे अनुदानाची मागणी केली. पण बस भाडेवाढसह कामगारांना देण्यात येणारे भत्ते गा्रठवल्याशिवाय पालिका अनुदान देणार नसल्याचे खुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे बेस्टने बसभाडीसह कामगारांचे भत्ते गोठवण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावाला शनिवारी पालिका सभागृहात अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बेस्टने प्रवास करणार्‍या प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. बस भाडे खिशाला परवडणारे नसल्यामुळे अनेक प्रवासी दैनंदिन तिकीट काढून मुंबईत प्रवास करतात. सध्या संपूर्ण मुंबईत दिवसभर प्रवास करण्यासाठी 70 रुपये भाडे आहे. तर, उपनगर 50 रुपये व शहर विभागात प्रवास करण्यासाठी 40 रुपये दैनंदिन भाडे आहे. यात आता अनुक्रमे 90 रुपये, 60 रुपये व 50 रुपये अशी वाढ होणार आहे. तब्बल 10 ते 20 रुपयाने वाढ होणार असल्यामुळे दैनंदिन तिकीट घेऊन प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या घटणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या बेस्टच्या बसमधून दररोज सुमारे 28 लाख प्रवासी प्रवास करतात. पण तिकीट भाड्यात होणार्‍या वाढीमुळे ही संख्या दोन ते तीन लाखाने घटणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दैनंदिन एसी बसचे भाडेही 150 रुपयांवरून 200 रुपये करण्यात येणार आहे.