Mon, Apr 22, 2019 21:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्टला ट्रायमॅक्स मशीनने डुबवले!

बेस्टला ट्रायमॅक्स मशीनने डुबवले!

Published On: Jul 15 2018 1:39AM | Last Updated: Jul 15 2018 1:30AMमुंबई : राजेश सावंत

मुंबईत सुमारे 100 वर्ष तग धरून असलेल्या बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. यात बस भाडेवाढ व शेअर रिक्षा-टॅक्सीच कारणीभूत नसून प्रवाशांना देण्यात येणार्‍या ट्रायमॅक्सच्या ई-तिकीट मशीनही तितक्यात जबाबदार आहेत. नादुरुस्त असलेल्या या मशीनमुळे फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे गेल्या वर्षभरात तब्बल 129 कोटी रुपयाने उत्पन्न घटले आहे. याला जबाबदार कोण ? असा प्रश्न आता बेस्टमधील लोकप्रतिनिधींकडून विचारला जात आहे. 

बेस्टच्या नाजूक आर्थिक परिस्थितीचा मोठा फटका येथे काम करणार्‍या सुमारे 45 हजार कर्मचार्‍यांना बसत आहे. कर्मचार्‍यांचे अनेक भत्ते गोठवण्यात आल्यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. पण यात काहीच फरक पडला नाही. उलट बेस्टची आर्थिक बाजू अजूनच कमकूवत होत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनाच आपली नोकरी शाबूत राहील की नाही, याबद्दल शंका आहे. बेस्टची आर्थिक परिस्थिती नाजूक का झाली, याची अनेक कारणे आहेत. यात गेल्या दहा वर्षात घटलेली प्रवाशांची संख्या हे प्रमुख कारण आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी तत्कालिन महाव्यवस्थापक स्वाधिन क्षत्रिय असताना, बेस्टच्या प्रवासांची संख्या दररोज 47 लाखांच्या घरात पोहोचली होती. आज ही संख्या 26 लाखांच्या घरात आहे. त्यात वेळोवेळी वाढवण्यात आलेल्या बस भाडेवाढीमुळे प्रवासी उपनगरीय रेल्वेसह शेअर रिक्षा-टॅक्सीकडे वळले गेले. याचा थेट परिणाम बेस्टच्या महसूलावर झाला. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची वार्षिक तूट 850 कोटी रुपयावर गेली. 

बेस्टला डुबवण्यामागे ट्रायमॅक्स मशीनही तितक्यात कारणीभूत आहे. सुमारे सहा वर्षापूर्वी कागदी तिकीट बंद करून तत्कालिन महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांच्या आग्रहाखातर ट्रायमॅक्स ई-तिकीट योजना राबवण्यात आली. नव्याचे नऊ दिवस प्रमाणे सुरुवातीला ही योजना बेस्टला फायदेशीर ठरली. पण त्यानंतर मशीनमध्ये होणार्‍या बिघाडामुळे कंडक्टर व प्रवाशांमध्ये भांडणे होऊ लागली. तर दुसरीकडे मशीन बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना जुन्या पद्धतीने तिकीट देण्यास सुरुवात केली. यात बराच वेळ जाऊ लागल्यामुळे कमी अंतराचा प्रवास करणारे प्रवासी तिकीट न घेताच उतरून जात आहेत. 

मासिक, त्रैमासिक पास योजनेचा तर बोर्‍याच वाजला आहे. प्रवासी ट्रायमॅक्सचा मासिक पास (स्मार्ट कार्ड) घेऊन बसमध्ये प्रवास करत असताना, मशीन नादुरुस्त असल्यामुळे त्याच्या पासाची तपासणीच होत नाही. मशीन बंद असल्यामुळे आपण तिकीट घ्या, अशी विनंती कंडक्टरने केली तर, प्रवासी माझा मासिक पास असताना मी तिकीट का घेऊ, असे सांगून मोकळा होतो. त्यामुळे पास संपलेले प्रवासीही याचा फायदा उठवत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे 2016-17 च्या तुलनेत 2017-18 मध्ये परिवहन विभागाचे तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न 129 कोटी रुपयाने घटले आहे.