Fri, Aug 23, 2019 21:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्ट बस महागली!

बेस्ट बस महागली!

Published On: Mar 04 2018 2:09AM | Last Updated: Mar 04 2018 2:09AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई पालिकेकडून आर्थिक अनुदान मिळावे, यासाठी पालिका आयुक्तांनी सुचवलेल्या व बेस्ट समितीत मंजूर झालेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला शनिवारी महापालिका सभागृहात सत्ताधारी शिवसेनेने गुपचुप मंजुरी दिली. त्यामुळे 6 किमीपासून 1 ते 12 रुपयेपर्यंत भाडेवाढ होणार आहे. याचा फटका तब्बल 12 ते 15 लाख प्रवाशांना बसणार असून याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. याला काँग्रेस व भाजपाने जोरदार विरोध केला आहे. 

बेस्टची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे बेस्टने पालिकेकडे 2 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली होती. पण ही मागणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी फेटाळत, परिस्थिती सुधारण्यासाठी कामगार व अधिकार्‍यांच्या महागाई भत्त्यासह अन्य भत्ते गोठवण्यासह भाड्याने बस घेणे व भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण या प्रस्तावाला कामगार संघटनांचा विरोध असल्यामुळे यावर निर्णय होऊ शकला नाही. अखेर ऑक्टोबरमध्ये बेस्ट समितीत सत्ताधारी शिवसेनेने भाडेवाढीसह कामगारांच्या भत्त्यात कपात करणे व तोट्यातील बसमार्ग बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.  हा प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी गेले तीन महिने पडून होता. 

अखेर शनिवारी हा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेस व भाजपाला अंधारात ठेवून गुपचूप मंजूर केला. दरम्यान मुंबईकरांवर लादण्यात आलेल्या भाडेवाढीला काँग्रेसचा विरोध असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक असून त्यांनी मुंबईकरांचे हित पाहिले पाहिजे. पण त्यांनी आपल्या पक्षाने आणलेल्या भाडेवाढीला मंजुरी देत, मुंबईकरांच्या थेट खिशात हात घातल्याचा आरोप राजा यांनी केला. भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनीही भाडेवाढीला जोरदार विरोध केला. शिवसेनेने थेट मुंबईकरांच्या खिशात हात घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला.