Mon, Aug 26, 2019 08:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्टला दर महिना १०० कोटी देणार

बेस्टला दर महिना १०० कोटी देणार

Published On: May 17 2019 2:17AM | Last Updated: May 17 2019 2:17AM
मुंबई : प्रतिनिधी

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला संजीवनी देण्यासाठी मुंबई महापालिका दर महिन्याला 100 कोटी रुपये अनुदान देणार आहे. कर्मचारी वेतन, निवृत्ती वेतन आणि बेस्टच्या सुधारणेसाठी हे पैसे वापरले जाणार असल्याचा निर्णय गुरुवारी पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. पालिकेने बेस्टला सुचवलेल्या काटकसरीच्या सुधारणांना अधीन राहून हे अनुदान दिले जाणार आहे.

बेस्ट उपक्रम मागील दोन वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. बेस्टवर सुमारे दोन हजार कोटींचे कर्ज असून 900 कोटींचा तोटा आहे. कर्मचार्‍यांचे मासिक वेतन देण्यासाठीही बेस्टकडे पैसे नसल्याने बँकांकडून कर्ज घ्यावे लागते आहे. बेस्ट हा सामान्य मुंबईकरांचा आधार असून तो जगवण्यासाठी पालिकेने बेस्टला दोन हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी राजकीय पक्ष व कामगार संघटनांकडून केली जात आहे. मात्र पालिकेने आर्थिक मदत देण्यास नकार  दिला होता. पालिकेचे नवीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताना बेस्टबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते.

बेस्टच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक महापौर दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर व आयुक्त प्रवीण परदेशी उपस्थित होते. बेस्टला सावरण्यासाठी प्रशासनाने दर महिन्याला 100 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली असल्याचे महापौरांनी सांगितले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील महिन्यात आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत आणखी एक बैठक घेणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहाने मंजूर केला आहे. त्यामुळे हे विलीनीकरण व्हावे, अशी मागणी या बैठकीत गटनेत्यांनी केली. त्यावर आयुक्त सकारात्मक असल्याचा दावा महापौरांनी केला. मात्र त्याबाबत आताच निर्णय घेता येणार नाही. पुढील सात ते आठ महिन्यांत बेस्टच्या आर्थिक सुधारणांची गती पाहून विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली, असे महापौरांनी सांगितले.