होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत ३१ लाख शेतकर्‍यांना : सहकारमंत्र्यांची माहिती

कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत ३१ लाख शेतकर्‍यांना : सहकारमंत्र्यांची माहिती

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 07 2018 12:28AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ आतापर्यंत 31 लाख शेतकर्‍यांना मिळाला असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. या योजनेनुसार 31 लाख 32 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे देशमुख म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या उपसमितीची आढावा बैठक आज मंत्रालयात सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या योजनेंतर्गत दाखल झालेल्या अर्जातील 47.73 लाख खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ मंजुर केला असून त्यासाठी सुमारे 23 हजार 102 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 5 फेब्रुवारी अखेर यापैकी 31 लाख 32 हजार कर्ज खात्यांवर 12 हजार 362 कोटी रूपये वितरित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मंजूर झालेल्या 47.73 लाख कर्ज खात्यांपैकी काही खात्यांची माहिती बँकांकडून अद्ययावत करून घेऊन पोर्टलवर पुन्हा अपलोड करण्यात आली आहे.

कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांची माहिती आणि बँकांकडील खात्यांची माहिती यांची पडताळणी केली असता 4 लाख 77 हजार कर्ज खाती या योेजनेच्या निकषात बसत नसल्याचे आढळून आले. या कर्ज खात्यांबाबतची माहिती पोर्टलद्वारे बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. बँकांनी सुमारे 1 लाख 75 हजार खात्यांची तपासणी करुन फेर प्रक्रियेसाठी पोर्टलवर अपलोड केली आहेत. 

योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या ज्या शेतकर्‍यांची माहिती बँकेकडील माहितीशी जुळली नाही अशा शेतकर्‍यांच्या खात्यांच्या माहितीची शहानिशा करुन  तालुकास्तरीय समित्यांद्वारे निर्णय प्रक्रियेसाठी 21.69 लाख कर्जखाती  ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. यापैकी बँकांनी 5 फेब्रुवारी अखेर एकूण 5.65 लाख खात्यांची माहिती अपलोड केलेली आहे.