Wed, Nov 14, 2018 08:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेएनपीटीविरोधातील असहकार आंदोलन मागे

जेएनपीटीविरोधातील असहकार आंदोलन मागे

Published On: May 13 2018 2:27AM | Last Updated: May 13 2018 2:16AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

जेएनपीटी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात 11 वाहतूकदार संघटनांनी  चार दिवसांपासून सुरु केलेल्या असहकार आंदोलनाचा शनिवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांच्या मध्यस्थीने शेवट झाला. पवारांनी दिलेल्या आदेशानुसार माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत व्हाईट हाऊसवर घेतलेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने असहकार आंदोलन मागे घेण्यात आले, असे सांगितले.

जेएनपीटीच्या पाच ठेकेदारांनी कामाला सुरुवात करायची की नाही याबद्दल दिल्लीत निर्णय होणार आहे. दिल्लीत शरद पवार, मंत्री नितिन गडकरी यांची ठेकेदार व जेएनपीटीबरोबर बैठक होणार आहे. 
शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या सोबत मंगळवारी होणार्‍या बैठकीत वाहतूकदारांच्या मागण्यांवर विचार केला जाईल. 

माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला मनसेचे बाळा नांदगावकर, शेकाप नेते विवेक पाटील उपस्थित होते.  ही बैठक 4 तास  सुरू होती. वाहतूकदारांच्या पाठीशी सर्व नेते उभे राहणार आहेत. शेतकर्‍यांच्या शेतमालाचा विचार करून आंदोलन मागे घेण्यात आले. वरिष्ठ नेत्याच्या विनंतीमुळे आम्ही हा तोडगा काढला असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. 

चार दिवसापासून  450 ते 500 कंटेनर शेतमालासह इतर जीवनाश्यक वस्तू लोडिंग करुन कोल्डस्टोरेजला उभे होते. बैठक संपताच वाहतूक सुरु झाल्याची माहिती घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.