होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्याजदर ‘जैसे थे’ 

व्याजदर ‘जैसे थे’ 

Published On: Apr 06 2018 2:13AM | Last Updated: Apr 06 2018 1:59AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पतधोरणाच्या द्वैमासिक आठवड्यात रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नसल्याने व्याजदरही ‘जैसे थे’ राहणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण आढावा समितीची गुरुवारी बैठक झाली, त्यात 2018-19 या नव्या आर्थिक वर्षात चांगल्या विकास दराची आशा आरबीआयला असून, जीडीपीचे लक्ष्य 7.4 टक्के इतके निश्‍चित करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महागाईचा दरही 4.7 टक्क्यांवरून 5.1 टक्के इतका वाढवण्यात आला आहे. 

रेपो रेटमध्ये कोणताही बदल न झाल्याने गृह आणि वाहन कर्जधारकांच्या व्याजदरातही कोणताही बदल सध्या तरी होणार नाही. मात्र, आपल्या मालमत्ता दायित्वाचा आढावा घेत बँकांना ठेवी आणि कर्जावरील व्याजदरात बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. आरबीआय बँकांना लघु कालावधीसाठी ज्या दराने पैसा देते, त्या रेपो रेटमध्ये गेल्या वर्षी ऑगस्टपासून बदल करण्यात आलेला नाही. हा दर 6 टक्के कायम असून रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आता 6 जून रोजी घेतला जाणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होणार्‍या वाढीमुळे पेट्रोल, डिझेलचे दर येत्या काही काळात भडकण्याची शक्यता लक्षात घेता महागाईची चिंतादेखील आरबीआयला आहे.