होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आणीबाणी नसती तर गाथा बुडाल्याच नसत्या; अशोक शहाणेंचा टोला

'...तर तुकारामांच्या गाथा बुडाल्याच नसत्या'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

आपल्याकडे आणीबाणीची परिस्थिती पहिल्यापासूनच आहे. ती काही आज नाही, नाही तर तुकारामांच्या गाथा बुडाल्याच नसत्या, असा टोला ज्येष्ठ समीक्षक अशोक शहाणे यांनी लगावला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे केंद्र आणि साद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी विद्रोही लेखक अशोक शहाणे यांच्याशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी शहाणे यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात हा सुसंवाद पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे अमोल नाले, साद संस्थेचे रवींद्र पोखरकर, मंजुषा खेडकर उपस्थित होते.

तुमच्यावर कुठल्या साहित्यिकाचा प्रभाव आहे, असे विचारले असता, अलीकडच्या कुठल्याच साहित्यिकाचा प्रभाव नाही. तसे म्हटले तर तुकारामांचा प्रभाव आहे, परंतु आपल्याकडे तुकाराम महाराजांनी भक्तीपर लेखन केले, असे शाळेत शिकविले जाते. आपल्याकडे तुकाराम कवी म्हणून शिकविले गेले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्याकडे भाषांतर करणे म्हणजे कुंडली जुळविण्यासारखे झाले आहे. जोड घालण्याचा धंदा झाला आहे, असे परखड मत व्यक्त करून ते म्हणाले, भाषांतर करणे म्हणजे मूळ भाषेत जे आहे, जी शैली आहे, ती शैली भाषांतरित भाषेत उतरली पाहिजे. मूळ भाषा आणि ज्यात अनुवाद करायचा आहे ती भाषा, यांच्यात समांतर शैली
निर्माण झाली तरच ते भाषांतर, समांतर शैली निर्माण झाली नाही तर ते भाषांतर नाही, असे स्षष्ट मत त्यांनी व्यक्त केले. 

एक भाषा दुसर्‍या भाषेला जाण देते, एकाच भाषेत जे सांगता येत नाही, ते दुसर्‍या भाषेत व्यक्त होता येते, त्यातून संवेदनशीलतेची प्रक्रिया निर्माण होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्याकडे लेखकांना केवळ लेखनावर गुजराण करता येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठात मराठी भाषा शिकविलीच जात नाही, भाषा ही बोलण्याची गोष्ट आहे, लिहिण्याची गोष्ट नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. रवींद्र पोखरकर यांनी आभार मानले.  

म्हणून मराठी भाषा निपजली

जे सांगायचे ते एका भाषेत सांगता येत नाही, म्हणून दुसरी भाषा निपजते. आपल्याकडे संस्कृत समृद्ध होती, तर मराठी का निपजली? संस्कृत नंतर प्राकृत भाषाही निपजली, पण तिला मान्यता मिळाली नाही, म्हणून मराठी निपजली, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

नेमाडेंना निव्वळ भाषा शिकवायची होती

आपल्याकडे भाषा शिकविली जात नाही, नेमाडेंना आणि आम्हा काही मित्रांना केवळ मराठी भाषा शिकविणारी शाळा काढायची होती, पण ते काही जमले नाही, असे ते म्हणाले. कवी नामदेव ढसाळ हे राजकारणात असले तरी त्यांचा लिखाणाचा आणि राजकारणाचा संबंध नव्हता. प्रत्येक लेखकाने कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. लेखक त्याला राहवत नाही म्हणून लिहितो, लेखकाचे लिहिणें म्हणजे आईला जसं बाळ पोटात ठेवता येत नाही, म्हणून ती बाळाला जन्म देते, आईची बाळाला जन्म देण्यातील जी उत्कटता आहे, तीच उत्कटता लेखकाच्या लिहिण्यामागे असते, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Tags : Tukaram Gatha, Emergency, Ashok Shahane


  •